राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत मुंबईच्या संघांचे वर्चस्व
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 10:51 AM2019-05-06T10:51:15+5:302019-05-06T10:51:46+5:30
६८ व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत महिला गटातील नवशक्ती क्रीडा मंडळ मुंबई उपनगर, संघर्ष क्रीडा मंडळ मुंबई उपनगर, शिवशक्ती क्रीडा मंडळ मुंबई शहर व स्वस्तिक क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर या संघानी उपांत्य फेरीत प्रवेश केला.
ठाणे : श्री मावळी मंडळ ठाणे आयोजीत ६८ व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत महिला गटातील नवशक्ती क्रीडा मंडळ मुंबई उपनगर, संघर्ष क्रीडा मंडळ मुंबई उपनगर, शिवशक्ती क्रीडा मंडळ मुंबई शहर व स्वस्तिक क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर या संघानी उपांत्य फेरीत प्रवेश केला. पुरुष गटात जय शिव क्रीडा मंडळ ठाणे, चेंबूर क्रीडा केंद्र मुंबई उपनगर, स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर व छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळ ठाणे या संघानी उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पुरुष गटातील उपउपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबई उपनगरच्या चेंबूर क्रीडा केंद्र संघाने ठाण्याच्या हुतात्मा शांताराम क्रीडा मंडळाचा अटीतटीच्या सामन्यात ४०-३७ अशी ३ गुणांनी मात करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. सदर सामन्यात मध्यंतराला चेंबूर क्रीडा केंद्र संघाने २५-६ अशी १९ गुणांची मोठी आघाडी घेतली ती सागर नार्वेकर व आकाश कदम यांच्या खोलवर चढायांमुळे. परंतु मध्यंतरानंतर हुतात्मा शांताराम क्रीडा मंडळाच्या परेश म्हात्रे व विवेक म्हात्रे यांनी आक्रमक खेळ करीत आपल्या संघाची गुणसंख्या भराभर वाढवली. परंतु शेवटच्या तीन मिनिटात चेंबूर क्रीडा केंद्र संघाने कल्पक खेळ करीत विजय संपादित केला.
महिला गटातील पहिल्या उपउपांत्य सामन्यात मुंबई उपनगरच्या नवशक्ती क्रीडा मंडळाने मुंबई उपनगरच्या टागोर नगर मित्र मंडळावर ३६-३३ असा ३ गुणांनी विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. सदर सामन्यात सुरुवातीपासूनच अतिशय अटीतटीचा झाला. दोन्ही संघानी अतिशय तंत्रशुद्ध खेळ करीत गुणफलक हलता ठेवला. मध्यंतराला टागोर नगर मित्र मंडळाने १९-१८ अशी नाममात्र १ गुणांची आघाडी घेतली. मध्यंतरानंतर मात्र नवशक्ती क्रीडा मंडळाच्या वेदांती सकपाळने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली व अतिशय सुंदर खेळ करीत आपल्या संघाला ३ गुणांनी विजय मिळवून दिला.
महिला गटातील दुसऱ्या सामन्यात मुंबई शहरच्या शिवशक्ती क्रीडा मंडळाने मुंबई उपनगरच्या स्वराज स्पोर्ट्स क्लब संघावर २७-१९ असा ८ गुणांनी विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. सदर सामन्यात शिवशक्ती क्रीडा मंडळाने मध्यंतराला १४-८ अशी ६ गुणांची आघाडी घेतली ती ज्योती डफळेच्या उत्कुष्ट चढायांमुळे. तिला साक्षि रहाटे व साधना विश्वकर्मा हिने पक्कडीत दिलेल्या उत्तम साथीमुळे. मध्यंतरानंतर स्वराज स्पोर्ट्स क्लब संघाच्या शशिका पुजारीने खोलवर चढाया करीत आपल्या संघाची गुणसंख्या वाढवली. परंतु ती आपल्या संघाचा पराभव टाळू शकली नाही.
अन्य निकाल :
महिला गट:
संघर्ष क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर (५४) वि. ओम नवमहाराष्ट्र मंडळ, मुंबई उपनगर (११)
स्वस्तिक क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर (४१) वि. रा. फ. नाईक विद्यालय, नवी मुंबई (१७)
पुरुष गट:
छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळ, ठाणे (३९) वि. बंड्या मारुती सेवा मंडळ, मुंबई शहर (३३)
स्वस्तिक क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर (३२) वि. उजाला क्रीडा मंडळ, ठाणे (९)
जय शिव क्रीडा मंडळ, ठाणे (३३) वि. जय बजरंग (वाशिंद), ठाणे (२०)