मुस्तफा कमाल यांचा राजीनामा
By Admin | Published: April 2, 2015 01:41 AM2015-04-02T01:41:25+5:302015-04-02T01:41:25+5:30
विश्वविजेत्या संघाला विजेता करंडक प्रदान करण्याची संधी नाकारल्यामुळे नाराज झालेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मुस्तफा कमाल
ढाका : विश्वविजेत्या संघाला विजेता करंडक प्रदान करण्याची संधी नाकारल्यामुळे नाराज झालेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मुस्तफा कमाल यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सोबतच आयसीसीचे चेअरमन एन. श्रीनिवासन यांच्यावर तोंडसुख घेत त्यांना ‘घाणेरडे व्यक्तिमत्त्व’ संबोधले.
शाह जलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर भरगच्च पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘‘मी आयसीसीकडे राजीनामा पाठवीत आहे. संविधानाच्या चौकटीत मला काम करणे कठीण होत आहे. घटनाबाह्य काम मी करू शकत नाही.’’
बांगला देश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष असलेले कमाल यांनी श्रीनिवासन यांच्यावर तोंडसुख घेत त्यांना ‘घाणेरडे आणि वादग्रस्त’ व्यक्तिमत्त्व संबोधले. आयसीसी आता इंडियन क्रिकेट कौन्सिल’ बनल्याची टीकादेखील केली.
श्रीनिवासन यांचे नाव न उच्चारताच कमाल म्हणाले, ‘‘मला त्यांचे नाव घेण्याचीही लाज वाटते. अशी व्यक्ती क्रिकेटची प्रमुख असेल तर क्रिकेट चालेल कसे? अशा लोकांना क्रिकेटपासून दूर ठेवायला हवे. ही व्यक्ती क्रिकेट घाणेरडे करीत आहे. मी राजीनामा का दिला याचा विचार आता आयसीसीने करावा.’’
मी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करीत होतो. ट्रॉफी देण्याचा अधिकार माझ्याकडून हिसकावून घेण्यात आला. त्या रात्री मी झोपू शकलो नाही. भारताविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत बांगला देशच्या पराभवास खराब अम्पायरिंग जबाबदार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. आयसीसीला त्यांचे आरोप फेटाळण्यासाठी स्पष्टीकरण द्यावे लागले होते.
कमाल यांच्या आरोपांमुळे श्रीनिवासन नाराज होते. त्यांनी सार्वजनिकरीत्या भाष्य न करता आयसीसी बोर्डापुढे तीव्र नापसंती दर्शविली होती. दुसरीकडे कमाल यांनी दावा केला, ‘मला माझे आरोप परत घेण्यास सांगण्यात आले. मी १८ कोटी जनतेचा अनादर होईल, असे सांगून आरोप परत घेण्यास नकार दिला. माफी मागितली नाही तर ट्रॉफी प्रदान करता येणार नाही, असे मला सांगण्यात आले होते. विश्वचषकात ट्रॉफी प्रदान करण्याचा मान अध्यक्षाला देणारा नियम जानेवारी २०१५ ला संशोधित करण्यात आला आहे.’
कमाल म्हणाले, ‘‘मी कुठल्याही देशाविरुद्ध बोललो नाही. मात्र खरे बोललो याची शिक्षा ट्रॉफी देण्याचा अधिकार काढून देण्यात आली. पंचांनी काही निर्णय हेतुपुरस्सर दिले होते किंवा नाही याची आयसीसीने सविस्तर चर्चा करावी, अशी मी मागणी केली आहे. मात्र आयसीसी सीईओ डेव्ह रिचर्डसन यांनी माझे वक्तव्य दुर्दैवी असल्याचे सांगितले.’’ मायदेशी परतल्यानंतर पत्रकारांनी गाठले तेव्हा आपण राजीनामा देणार का, असा सवाल विचारण्यात आला. यावर कमाल यांनी मी तेच करीत असल्याचे सूचक वक्तव्य केले.(वृत्तसंस्था)