पॅरिस ऑलिम्पिकचं तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करत असलेला भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तिपटू बजरंग पूनिया याला मोठा धक्का बसला आहे. नियमानुसार उत्तेजक चाचणी न केल्याने NADA ने आज बजरंगवर कारवाई करत त्याला निलंबित केले आहे. त्यामुळे बजरंगचं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगण्याची शक्यता आहे.
बजरंग पूनिया याच्यावर राष्ट्रीय अँटी डोपिंग एजन्सीकडून (NADA) निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. उत्तेजक चाचणीसाठी नमुने न दिल्याने बजरंग पूनियाला NADA ने निलंबित केल्याचे सांगण्यात येत आहे. यावर्षी मार्चमध्ये सोनीपत येथे झालेल्या ट्रायलनंतर बजरंग पूनियाने उत्तेजक चाचणी दिली नव्हती. आता त्याच्यावरील ही बंदी हटवली गेली नाही तर बजरंग पूनिया याला पॅरिस ऑलिम्पिकसाठीच्या फायनल ट्रायलमध्ये सहभागी होता येणार नाही.
भारताच्या आघाडीचा कुस्तीपटू असलेल्या बजरंग पूनिया याने २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये ६५ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले होते. गरतवर्षी महिला कुस्तीपटूंच्या झालेल्या कथिल लैंगिक शोषणाप्रकरणी बजरंग पूनिया याने आवाज उठवला होता. त्यानंतर झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बजरंग अपयशी ठरला होता मात्र त्यानंतर त्याने ऑलिम्पिकसाठी अधिक जोमाने तयारी सुरू केला होती.