राष्ट्रीय बॉक्सिंग : नुपुरचा पहिल्याच सामन्यात दणदणीत विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 11:06 PM2019-12-03T23:06:50+5:302019-12-03T23:07:04+5:30
पूरने ( 75 किलो) राजस्थानच्या श्वेतावर 5-0 ने सहज विजय मिळवून तिच्या मोहिमेला चांगली सुरुवात केली.
कन्नूर : मंगळवारी केरळच्या कन्नूरच्या मुंडयाद इंडोर स्टेडियममध्ये चौथ्या एलिट महिलांच्या राष्ट्रीय बॉक्सिंग चँपियनशिपच्या दुस-या दिवशी चंदीगड आणि पंजाबच्या बॉक्सर्सने वर्चस्व राखले.दिवसाची सुरुवात गेल्या वर्षाची कांस्यपदक विजेते मणिपूर येथील के.एच. शमीम बानो आणि चंदिगडच्या सविता यांच्यातील 54 किलो वजनीगटाच्या लढतीने झाली. दोन्ही बॉक्सर्सनी सुरुवातीला सावधगिरीने खेळ केला. पण, सरिताने आक्रमक खेळ करत सामन्यात 3-2 असा विजय मिळवला.
गेल्या वर्षीची रौप्यपदक विजेता हरयाणाच्या नुपूरने ( 75 किलो) राजस्थानच्या श्वेतावर 5-0 ने सहज विजय मिळवून तिच्या मोहिमेला चांगली सुरुवात केली. मध्य प्रदेशच्या जिग्यासा राजपूतने (81 किलो) पूर्वीच्या संस्करणातील कांस्यपदक जिंकलेल्या उत्तराखंडच्या बबिताला 5-0 ने पराभूत केले. 64 किलो गटात चंडीगडच्या नीमाने सिक्कीमच्या सर्मिला रायविरुद्ध विजय मिळवण्यासाठी शानदार फॉर्म व तंदुरुस्ती दर्शविली. पहिल्या फेरीतच तिने प्रतिस्पर्धी खेळाडूला गारद केले.चंदीगडच्या मोनिका (51 किलो), रितू ( 57 किलो), मंजू (60 किलो) यांनी देखील आपापल्या सामन्यात विजय मिळावले.
दिवसभरात एकूण 52 बाउट्स खेळण्यात आले, तर पंजाबच्या मनदीप कौर संधूने उत्तर प्रदेशच्या शिल्पा बालियानला 5-0 असे पराभूत केले.पहिल्या फेरीत सावधगिरीने खेळल्यानंतर आणि प्रतिस्पर्ध्याच्या डावपेचांचे अनुमान काढल्यानंतर, मनदीपने शेवटच्या दोन फे-यांमध्ये चमक दाखवत सामना जिंकला. पंजाबच्या गगनदीप कौर (69 किलो) व कमलजीत कौर (51 किलो) यांनी सहज विजय मिळवला.
बॉक्सर्स 48 किलो,51 किलो, 54 किलो, 57किलो, 60किलो, 64 किलो, 69 किलो, 75 किलो, 81 किलो आणि 81 किलो वरील गटात सहभागी झाले आहेत. गटात प्रथमच लडाखचा संघ सहभागी होणार आहे.प्रारंभिक सामने पहिल्या चार दिवस आणि त्यानंतर 6 डिसेंबरपासून बाद फेरीच्या सामन्याला सुरुवात होईल. अंतिम सामने 8 डिसेंबरला होणार आहेत.