रोहा : पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम व शेवटच्या दिवशी रोहा येथे डी. जी. क्रीडागनगरी मैदानात कबड्डी स्पर्धाचा थरार बघायला मिळाला. सेनादल विरुद्ध हरियाणा व महाराष्ट्र विरुद्ध भारतीय रेल्वे दोन उपांत्य फेरीचे सामने झाले. महाराष्ट्राला यावेळी रेल्वेकडून पराभव पत्करावा लागला आणि त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. रेल्वेने महाराष्ट्रावर ४७-२० असा दणदणीत विजय मिळवला.
रेल्वेने सुरुवातीपासून चढाईत व पकडीत चांगला खेळ करत आघाडी मिळवली. मध्यंतरापर्यत २५-१० अशी आघाडी रेल्वे कडे होती. रेल्वेच्या सुनील व परवेशच्या कव्हर जोडीने चांगल्या पकडी केल्या, तर पवन कुमारने चढाईत १२ गुण मिळवत रेल्वेला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. रवींद्र पहल ने ३ पकडी केल्या. रेल्वेने ४७-२० असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्र कडून तुषार पाटीलने ७ गुण मिळवले. अजिंक्य पवारने २ पकडी केल्या. बलाढ्य रेल्वेच्या संघासमोर महाराष्ट्र संघाचे प्रयत्न अयशस्वी ठरले. अंतिम सामना सेनादल विरुद्ध रेल्वे यांच्यात होईल.
सेनादल विरुद्ध हरियाणा यांच्यात पहिला उपांत्य फेरीचा सामना रंगला. सेनादल संघाने आक्रमक पवित्रा घेत मोनू ने ३-० अशी सुरुवात करून दिली. मोनू गोयतला नवीन कुमारने चांगली साथ दिली. मध्यंतरापर्यत ३१-१७ अशी भक्कम आघाडी सेनादल कडे होती. मोनू गोयतने चढाईत १२ गुणाची तर नवीन कुमारने ११ गुण मिळवले. महेंद्र सिंग व नितेश कुमार यानी ५-५ पकडी करत सेनादल संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. हरियाणा कडून प्रदीप नरवालने १३ गुणाची कमाई केली. संघाला विजय मिळवून देण्यात त्याला अपयश आले. सेनादलने ५२-३८ असा विजय मिलवत अंतिम फेरीत प्रवेश केला.