इंदौर : दोन वेळेसचा आॅलिम्पिक पदकविजेता सुशील कुमार हा उद्यापासून येथे सुरू असणा-या राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत सर्वांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू असेल. तो येथे या स्पर्धेद्वारे तीन वर्षांनंतर मॅटवर पुनरागमन करणार आहे.पुरुष फ्री स्टाइलचा दिग्गज पहिलवान सुशीलशिवाय या चारदिवसीय स्पर्धेत महिला गटातील सर्वांचे लक्ष हे रिओ आॅलिम्पिकमध्य कास्यपदक जिंकणारी साक्षी मलिक आणि गीता फोगट यांच्या कामगिरीवरही असेल.तथापि, लंडन आॅलिम्पिकमध्ये कास्यपदक जिंकणारा योगेश्वर दत्त या स्पर्धेत दिसणार नाही, तर बजरंग पुनियादेखील या स्पर्धेत खेळणार नाही. २१ ते २६ नोव्हेंबरदरम्यान पोलंडच्या बिडगोज येथे होणा-याअंडर २३ विश्वचॅम्पियनशिपसाठी बजरंग पुनिया तयारी करीत आहे.पुढील वर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि आशियाई स्पर्धेसाठी तयारी करीत असणारा सुशील ७४ किलो वजन गटात पुन्हाएकदा आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही. तो रेल्वेचे प्रतिनिधित्व करणार आहे.जॉर्जियाच्या तबलिसी येथे ट्रेनिंग करणारा सुशील दिनेशविरुद्ध ७४ किलो वजन गटाच्या निवड चाचणीसाठी गेल्या आठवड्यात मायदेशी परतला होता. तथापि, राष्ट्रीय ज्युनिअर चॅम्पियन दिनेशने सुशील कुमारला वॉकओव्हर दिला आहे.आॅगस्ट महिन्यात विश्व चॅम्पियनशिपमध्ये खराब कामगिरीनंतर साक्षी आणि विनेश फोगट या स्पर्धेद्वारे लय मिळवण्याचा प्रयत्न करतील. साक्षी महिलांच्या ६२ किलो वजन गटात खेळणार आहे. या स्पर्धेत ८०० पहिलवान, १०० प्रशिक्षक आणि ५० तांत्रिक अधिकारी सहभागी होणार आहेत. बबिता कुमारी दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळणार नाही.ताजातवाना सुशील पाहायला मिळेल-पात्रता स्पर्धेनंतर सुशील म्हणाला की, ‘कुस्ती चाहत्यांना राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये ताजातवाना सुशील पाहायला मिळेल.’३४ वर्षीय सुशीलने याआधी २०१४ ग्लास्गो राषट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. सुशीलला रिओ आॅलिम्पिक २०१६ मध्ये सहभागी होण्यापासून रोखण्यात आले होते.त्या वेळेस डब्ल्यएफआयने या स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नरसिंगविरुद्ध ट्रायल खेळावी लागेल हा दिलेला शब्दफिरवला होता.त्यानंतर सुशीलने न्यायालयाचे दार ठोठावले; परंतु दिल्ली उच्च न्यायालयाने ७४ किलो वजन गटातील ट्रायलची त्याची मागणी धुडकावून लावली होती.
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा : सुशीलच्या कामगिरीवर लक्ष, तीन वर्षांनंतर मॅटवर करणार पुनरागमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:53 AM