नवोदित 'मुंबई श्री'चे पीळदार द्वंद्व शुक्रवारी रंगणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 04:56 PM2019-11-27T16:56:56+5:302019-11-27T16:58:05+5:30
मुंबई व उपनगरातील 200 पेक्षा अधिक उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटू सज्ज
मुंबई : शरीरसौष्ठवपटूंसाठी "बालवाडी" असलेल्या नवोदित मुंबई श्रीचा गर्दीमय पीळदार सोहळा येत्या शुक्रवारी 29 नोव्हेंबरला कांदिवली पश्चिमेला असलेल्या महावीर नगराजवळील शाम सत्संग भवनात रंगणार आहे. बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटना संयुक्तपणे उदयोन्मुख आणि नवोदित शरीरसौष्ठवपटूंसाठी 'हक्काचे व्यासपीठ' असलेल्या 'नवोदित मुंबई श्री' चे पुन्हा एकदा दिमाखदार आयोजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे यंदा महावीर नगरात नवोदित शरीरसौष्ठवपटूंचे आखीवरेखीव थरार पाहायला मिळणार हे निश्चित.
दिवसेंदिवस शरीरसौष्ठवाबाबत नवोदित शरीरसौष्ठवपटूंमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत असून हिवाळ्यात डंबेल्स मारून बेटकुळ्या काढण्याचे प्रमाणही तरूणांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसू लागलेय. अशाच हौशी आणि नवोदित शरीरसौष्ठवपटूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्याच शरीरसौष्ठवाची आवड वाढावी म्हणून संघटनेने नवोदित मुंबई श्री या स्पर्धेलाही ग्लॅमरस केले आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेतही नवोदित आणि उदयोन्मुख खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी होतात. यावेळी स्पर्धेसाठी नवोदित खेळाडू प्रचंड संख्येने तयारीत करीत असून प्रत्येक गटात 40 ते 50 खेळाडू उतरणार असल्याची माहिती उपनगर शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अमोल कीर्तीकर यांनी दिली. या स्पर्धेच्या माध्यमातून मुंबई शरीरसौष्ठवाला नवे खेळाडू मिळणार आहेत, हे विशेष.
स्पर्धा आयोजनासाठी संघटकांचा पुढाकार
यंदाची नवोदित मुंबई श्री जोरदार व्हावी म्हणून टेक्नोक्राट्स कोहलौर इफ्रास्ट्रक्चरने आर्थिक सहकार्याचा हात दिला. मात्र ते सहकार्य पुरेसे नव्हते. त्यामुळे नेहमीप्रमाणे शरीरसौष्ठवाच्या अजय खानविलकर, शंकर कांबळी, विजय झगडे, अशोक शेलार, अँथनी जोसेफ, राम नलावडे, सचिन जाधव, राजेंद्र गुप्ता, सुनील शेगडे, संतोष दुबे, राजेश सावंत ,किट्टी फोन्सेका या सक्रिय संघटकांनी पुन्हा एकदा आपल्या खिशात हात घालून या स्पर्धेसाठी पुरेसा निधी उभारला. यामुळे नवोदितांची स्पर्धा दिमाखदार होईलच सोबतीला लाखाची रोख बक्षिसेही दिली जाणार आहेत. एकंदर सात गटांत खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत प्रत्येक गटात अव्वल पाच खेळाडूंना 5, 4, 3, 2 आणि 1 हजाराचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. तसेच स्पर्धेचा विजेता 15 हजार रूपयांचा मानकरी ठरेल.
वेळेवर सुरू होणार स्पर्धा
स्पर्धकांचा मोठ्या संख्येने सहभाग असल्यामुळे खेळाडूंची वजन तपासणी त्याचदिवशी दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान स्पर्धास्थळी घेतली जाणार आहे. स्पर्धेला वेळेचे बंधन असल्यामुळे दोनशेच्या आसपास खेळाडूंचा सहभाग असलेली स्पर्धा वेळेत संपन्न व्हावी म्हणून सायंकाळी पाच वाजताच सुरू करणार असल्याचे बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष नंदू खानविलकर यांनी सांगितले. स्पर्धेसाठी खेळाडू मोठ्या संख्येने तयारी करीत असल्यामुळे अधिक माहितीसाठी सुनील शेगडे (9223348568), प्रभाकर कदम (9757134952) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत यांनी केले.