‘नवोदित मुंबई श्री’ किताबावर परळच्या अनिल बिलावाचा कब्जा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 01:58 AM2018-12-04T01:58:31+5:302018-12-04T01:58:38+5:30
परळच्या अनिल बिलावा याने शरीरसौष्ठव स्पर्धेचा कोणताही अनुभव नसताना सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत नुकत्याच झालेल्या स्पर्धेत नवोदित मुंबई श्री किताब पटकावला.
मुंबई : परळच्या अनिल बिलावा याने शरीरसौष्ठव स्पर्धेचा कोणताही अनुभव नसताना सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत नुकत्याच झालेल्या स्पर्धेत नवोदित मुंबई श्री किताब पटकावला. त्याचप्रमाणे, परब फिटनेस संघाच्या महम्मद हुसेन खान याने उत्कृष्ट पोझरचा मान मिळवला. विशेष म्हणजे एकूण ७ वजनी गटांतील ही स्पर्धा अत्यंत अटीतटीची झाली; आणि प्रत्येक गटामध्ये कंपेरिझन केल्यानंतर गटविजेत्याची निवड करण्यात आली.
गोरेगाव पूर्वेकडील पांडुरंग वाडीच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत सहभागी सर्व शरीरसौष्ठवपटूंनी आपल्या पीळदार शरीरयष्टीने उपस्थितांना भुरळ पाडली. सुमारे तीन हजारांहून अधिक प्रेक्षकांनी उपस्थिती लावताना खेळाडूंचा उत्साह वाढवला. प्रत्येक वजनी गटामध्ये ३०-३५ खेळाडू सहभागी झाल्याने सुरुवातीला १० आणि त्यानंतर अव्वल ५ खेळाडूंची निवड करताना परीक्षकांना चांगलीच कसरत करावी लागली. ५५ किलो आणि ६० किलो वजनी गटाचा अपवाद वगळता प्रत्येक गटाचा विजेता वेगवेगळ्या जिमचा ठरला. ५५ आणि ६० किलो वजनी गटात हेमंत भंडारी व विपुल सावंत या
बॉडी वर्कशॉपच्या खेळाडूंनी वर्चस्व राखले.
अंतिम फेरीत ७५ किलो वजनी गटाच्या अनिल बिलावापुढे इतर सहा गटविजेते फिके पडले. त्याची लक्षवेधी शरीरयष्टी परीक्षकांनाही मोहित करणारी ठरली. शिवाय प्रेक्षकांनीही अनिलचाच जयघोष केल्याने स्पर्धेचा विजेता कळण्यास फार उशीर झाला नाही.
>गटनिहाय निकाल :
५५ किलो वजनी गट : १. हेमंत भंडारी
(बॉडी वर्कशॉप), २. नितेश कोळेकर (परब फिटनेस), ३. संजय आंग्रे (राहुल).
६० किलो : १. विपुल सावंत (बॉडी वर्कशॉप), २. महेश कांबळे (गुरूदत्त), ३. सुमीत यादव (बॉडी वर्कशॉप).
६५ किलो : १. रूपेश चव्हाण (एलटी फिटनेस), २. अभिषेक पाटील (गुरूदत्त), ३. सलीम शेख (बॉडी वर्कशॉप).
७० किलो : १. मकरंद दहिबावकर (किट्टी जिम), २. शेख कादर बादशाह (गुरूदत्त), ३. सुनील गुरव (वेट हाउस).
७५ किलो : १. अनिल बिलावा (हर्क्युलस जिम), २. महम्मद हुसेन खान (परब), ३. हेमंत कंचावडे (फॉर्च्युन फिटनेस).
स्पर्धेचा निकाल :
नवोदित मुंबई श्री : अनिल बिलावा
उत्कृष्ट पोझर : महम्मद हुसेन खान