मुंबई : भारताची धावपटू निर्मला शेरॉन ही डोपिंगमध्ये दोषी आढळली आहे. त्यामुळे भारतावर सुवर्णपदके गमवण्याची नामुष्की आली आहे. शेरॉनवर ‘अॅथेलेटिक्स इंटिग्रिट युनीट (एआईयू)’ ने डोपिंगमध्ये दोषी सापडल्याप्रकरणी चार वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शेरॉनने जिंकलेली दोन सुवर्णपदके भारताला परत करावी लागणार आहेत.
एआईयूने 2018 साली भारतामध्ये झालेल्या स्पर्धेत शेरॉनला दोषी ठरवले आहे. या स्पर्धेत स्टेरॉयड ड्रोस्तानोलोन और मेटेनोलोनचा वापर शेरॉनने केला, असे म्हटले गेले आहे. त्यामुळे ऑक्टोबरपासून शेरॉनवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एआईयूनुसार शेरॉनच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये काहीतरी गडबड असल्याचे जाणवले होते. त्यानंतर सखोल तपास आणि चाचणी केल्यानंतर शेरॉन दोषी असल्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय शेरॉनला सांगण्यात आला असून तिने याप्रकरणी चौकशीची मागणी केलेली नाही.
शेरॉनने 2017 साली भारतामध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्णपदकांची कमाई केली होती. या स्पर्धेत शेरॉनने 400 मीटर आणि 4 बाय 400 मीटर या दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. रिओ येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्येही शेरॉनने या दोन्ही विभागांमध्ये भारताकडून सहभाग घेतला होता.