माद्रिद : जागतिक टेनिस क्रमवारीतील अव्वल पुरुष खेळाडू सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने आगामी फ्रेंच ओपन स्पर्धेसाठी आपण सज्ज असल्याचे दाखवत माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. सन २०१३ नंतर पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभागी झालेल्या जोकोने दुसऱ्या फेरीत क्रोएशियाच्या युवा बोर्ना कोरिचला टेनिसचे धडे देताना ६-२, ६-४ असे नमवले. तिसऱ्या फेरीत जोकोपुढे रॉबर्टो बतिस्टा अगुत याचे आव्हान असेल. स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत जोकोला पुढच्या फेरीसाठी बाय मिळाला. पाच वर्षांपूर्वी जोकोने या स्पर्धेचे विजेतेपद उंचावले होते. तसेच यंदाच्या मोसमात जोकोची ही दुसरी क्ले कोर्ट स्पर्धा आहे. याआधी झालेल्या माँटे कार्लो क्ले कोर्ट स्पर्धेत जोकोला जिरी वेस्लीविरुद्ध पराभूत व्हावे लागले होते. अन्य लढतीत, आॅस्टे्रलियाच्या निक किर्गियोसने स्वित्झर्लंडच्या चौथ्या मानांकित स्टेनिसलास वावरिंकाला ७-६, ७-६ असा धक्का देत अनपेक्षित विजयाची नोंद केली. (वृत्तसंस्था)झेक प्रजासत्ताकचा आठवा मानांकित थॉमस बेर्दिचने सहजपणे आगेकूच करताना उझबेकिस्तानच्या डेनिस इस्तोमिनचा ६-३, ६-३ असा धुव्वा उडवला. फ्रान्सच्या सातव्या मानांकित विल्फ्रेड त्सोंगानेही विजयी आगेकूच करताना स्पेनच्या एल्बर्ट रामोसचे कडवे आव्हान ७-६, ५-७, ६-४ असे परतावले.सकारात्मक सुरुवात करण्याचा माझा निर्धारयंदाच्या सत्रातील क्ले कोर्टवरील ही माझी दुसरी लढत होती. पहिल्या लढतीत पराभूत झाल्यानंतर आता विजय मिळवल्याने मी उत्साहित आहे. यासाठी मी खडतर मेहनत घेतली होती आणि स्वत:ला मानसिक व शारीरिकरीत्या मजबूत केले होते. मागील काही वेळेपासून मी सातत्याने टेनिस खेळलो आहे. या स्पर्धेत सकारात्मक सुरुवात करण्याचा निर्धार होता आणि येथे विजयी सुरुवात केल्याचा आनंद आहे.- नोव्हाक जोकोविच
नोव्हाक जोकोविच तिसऱ्या फेरीत
By admin | Published: May 06, 2016 5:02 AM