नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला मल्ल सुमित मलिक बल्गेरियात नुकत्याच झालेल्या पात्रता स्पर्धेत डोपिंगमध्ये अपयशी ठरताच त्याच्यावर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आली.ऑलिम्पिकला ४९ दिवस शिल्लक असताना भारतासाठी ही मोठी नामुष्की ठरली. ऑलिम्पिक सुरू होण्याआधी सलग दुसऱ्यांदा मल्ल डोपिंगमध्ये अडकण्याचीही दुसरी वेळ ठरली. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकआधी नरसिंग पंचम यादव डोपिंगमध्ये अपयशी ठरला होता. त्याच्यानवर नंतर चार वर्षांची बंदी लावण्यात आली. २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेचा सुवर्ण विजेता सुमित बल्गेरियात १२५ किलो वजन गटात ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला होता. तथापि २३ जुलैपासून सुरू होत असलेल्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याचे या २८ वर्षांच्या मल्लाचे स्वप्न भंगले. युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या जागतिक संघटनेने कालच भारतीय कुस्ती महासंघाला ही माहिती दिली.ब नमुना पॉझिटिव्ह आढळल्यास बंदीसुमितला आता १० जून रोजी चाचणीचा ब नमुना द्यावा लागेल. ऑलिम्पिक पात्रता फेरीआधी राष्ट्रीय शिबिरादरम्यान मलिकच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. गुडघेदुखीवर तो आयुर्वेदिक औषध घेत होता. त्यात काही प्रतिबंधित पदार्थ असण्याची शक्यता आहे. ब नमुना पॉझिटिव्ह आल्यास सुमितवर बंदी घातली जाईल, अशी माहिती कुस्ती महासंघाचे सचिव विनोद तोमर यांनी दिली. भारताने ऑलिम्पिकमध्ये आठ स्थानांचा कोटा मिळविला असून, त्यात प्रत्येकी चार- चार पुरुष, तसेच महिला मल्लांचा समावेश आहे.
मल्ल सुमित मलिक डोपिंगमध्ये अडकला; ४९ दिवसांआधी भारताच्या ऑलिम्पिक मोहिमेला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2021 6:55 AM