मनू भाकरने मिळवले ऑलिम्पिक तिकिट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 04:18 AM2019-05-30T04:18:37+5:302019-05-30T04:18:49+5:30
युवा नेमबाज मनू भाकरने बुधवारी येथे आयएसएसएफ विश्वचषकमध्ये महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत चौथ्या स्थानावर राहताना भारतासाठी नेमबाजीमध्ये सातवा ऑलिम्पिक कोटा मिळवला.
म्युनिच : युवा नेमबाज मनू भाकरने बुधवारी येथे आयएसएसएफ विश्वचषकमध्ये महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत चौथ्या स्थानावर राहताना भारतासाठी नेमबाजीमध्ये सातवा ऑलिम्पिक कोटा मिळवला. १७ वर्षीय मनूने फायनलमध्ये २०१.० अंकांसह आॅलिम्पिक कोटा पटकावला.
अव्वल विश्व स्पर्धामध्ये अनेक पदके जिंकणारी मनू पात्रता फेरीत ५८२ अंकासह तिसऱ्या स्थानी होती. तिने अंतिम दोन फेऱ्यांमध्ये ९८ गुणांची कमाई केली. सोमवारी मनूच्या पदरी निराशा आली. आघाडीच्या स्थानावर असताना तिची बंदूक खराब झाली आणि तिला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. महिलांच्या १० मीटर पिस्तूल स्पर्धेत भारताचा हा पहिला कोटा आहे.
सौरव चौधरी व अभिषेक वर्मा यांनी अनुक्रमे दिल्ली व बीजिंगमध्ये विश्वकप स्पर्धेत पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल स्पर्धेत आॅलिम्पिक कोटा मिळवला होता. ज्युनिअर विश्वकप चॅम्पियन यशस्वीनी सिंग देसवाल ही देखील अंतिम फेरीत स्थान मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करीत होती, पण अंतिम सेटमध्ये ९२ गुणांसह ५७४ अंकांसह ती २२ व्या स्थानी घसरली. स्पर्धेत सहभागी झालेली तिसरी भारतीय हीना सिद्धू ५७० अंकांसह ४५ व्या स्थानी राहिली. (वृत्तसंस्था)