जालना : राजकीय नेते आणि मोठ्या कंपन्यांनी पुढाकार घेऊन एकेक पहिलवान दत्तक घेतला तर महाराष्ट्राला देशासाठी आॅलिम्पिक मेडल जिंकून देणे कठीण नाही, असे मत व्यक्त केले आहे ते अर्जुनपुरस्कारप्राप्त काका पवार यांनी.जालना येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी काका पवार आले आहेत.
काका पवार हे १९९९ साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित असून त्यांना खेळाडू म्हणून १९८८ आणि प्रशिक्षक म्हणून २0१६ साली शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जालना येथील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या नियोजनाचीही काका पवार यांनी प्रशंसा केली. या वेळी त्यांनी लोकमतशी विशेष संवाद साधला.
प्रतिभावान मल्लांना दत्तक घ्यावे काका पवार म्हणाले, ‘‘राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांचे महाराष्ट्राच्या मल्लाने आॅलिम्पिकमध्ये मेडल जिंकावे हे स्वप्न आहे. त्यामुळे यांनी राहुल आवारे, उत्कर्ष काळे, किरण भगत, अभिजीत कटके यांना दत्तक घेतले असून त्यांना प्रति महिना एक लाख रुपये खुराक व प्रशिक्षणासाठी दिले आहेत. त्यांच्याप्रमाणेच मोठे राजकीय नेते, मोठ्या कंपन्या आणि दानशूर व्यक्तींनी महाराष्ट्रातील प्रतिभवान असणारे एकेक मल्ल दत्तक घ्यायला हवा. असे झाल्यास महाराष्ट्रातील पहिलवानाला आॅलिम्पिकमध्ये मेडल जिंकण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. शरद पवार यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता मल्लांवर आहे.’’
मराठवाड्यात कुस्ती केंद्र सुरु करणार ‘‘प्रतिष्ठित अशी महाराष्ट्र केसरी कुस्ती आयोजन करु शकतो हे मराठवाड्याने दाखवून दिले. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचेही नियोजनही चांगल्या पद्धतीने होत आहे.’’ पुणे येथे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाद्वारे २५ पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय पहिलवान घडवणाऱ्या काका पवार यांनी मराठवाड्यातील मल्लांसाठी कुस्ती केंद्र सुरु करण्यास पुढाकार घेण्यास तयार असल्याचे सांगताना लातूर येथे कुस्ती केंद्रासाठी शासनाकडे एक एकर जागा मागितली असल्याची माहितीही दिली.
आपल्याकडे आंतरराष्ट्रीय पहिलवानांची फळी गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकप्राप्त राहुल आवारे आतापर्यंत आॅलिम्पिक खेळू शकला असता; परंतु २0१२ आणि २0१६ मध्ये गुणवत्ता असूनही त्याच्यावर अन्याय झाला. त्यावेळी कुस्ती संघटकांच्या पाठिंबा नसल्यामुळे तो आॅलिम्पिक खेळू शकला नाही. २0१२ मध्ये राहुल ज्या गटात खेळतो त्या गटात जाणीवपूर्वक १00 पेक्षा जास्त पहिलवान ट्रायल्समध्ये खेळवले गेले तसेच २0१६ मध्ये ट्रायल न घेता भारतीय संघ पाठवल्याने राहुलवर मोठा अन्याय त्या वेळेस झाला आहे. राहुल आवारे आणि उत्कर्ष काळे हे आॅलिम्पिकमध्ये देशाला मेडल्स जिंकून देतील असा विश्वास आहे. या दोघांशिवायही आता आपल्याकडे आंतरराष्ट्रीय पहिलवानांची फळी मोठी आहे. या सर्वांचे भविष्य उज्वल असल्याचेही काका पवार यांनी सांगितले.