पी. यू. चित्राने घेतली ‘सुवर्ण’ धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 03:25 AM2019-04-25T03:25:20+5:302019-04-25T03:25:30+5:30
पी.यू. चित्राने बुधवारी येथे आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या चौथ्या आणि अखेरच्या दिवशी १५०० मीटर मध्ये आपले विजेतेपद कायम ठेवत भारताला तिसरे सुवर्ण पदक मिळवून दिले.
दोहा : पी.यू. चित्राने बुधवारी येथे आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या चौथ्या आणि अखेरच्या दिवशी १५०० मीटर मध्ये आपले विजेतेपद कायम ठेवत भारताला तिसरे सुवर्ण पदक मिळवून दिले. दुसरीकडे, अजय कुमार सरोज याने पुरूषांच्या १५०० मीटरमध्ये रौप्य आणि दुतीचंदने महिलांच्या २०० मीटर स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली.
चित्राने बहारीनची धावपटू टायगेस्ट गाशॉ हिला अंतिम रेषेच्या काही मीटर आधी पिछाडीवर सोडले. खलीफा स्टेडिअममध्ये झालेल्या या थरारक शर्यतीमध्ये चित्राने ४ मिनिट १४.५६ सेकंदांत बाजी मारली. बहरीनच्या टागेस्टने ४.१४.८१ ही वेळ नोंदवत रौप्य, तर मुटल विनफ्रेड यावीने ४.१६.१८ सेकंदासह कांस्य पदक मिळवले.
या स्पर्धेतील भारताचे हे तिसरे सुवर्ण पदक आहे. या आधी गोमती एस. (८०० मीटर) व तेजिंदर पाल सिंह (गोळा फेक) यांनी सोमवारी सुवर्ण पदक जिंकले होते. १५०० मीटर शर्यतीत अजयने ३ मिनिट ४३.१८ सेकंदासह रौप्य मिळवले. बहारीनच्या अब्राहम किपचिरचिर रोटिचने (३ मिनिट ४२.८५ सेकंद) सुवर्ण पटकावले. महिलांच्या २०० मीटर शर्यतीत दुती चंदने २३.४५ सेकंदाची वेळ देत कांस्य पदक जिंकले.
शर्यतीच्या अखेरीस बहारीनच्या धावपटूच्या बाजूला पोहचल्यावर मी थोडी नर्व्हस झाली होती. कारण तीने मला आशियाई स्पर्धेत मागे टाकले होते. मला शेवटच्या टप्प्यात खुपच जास्त मेहनत करावी लागली.
- पी. यू. चित्रा