Paralympics 2021 : महाराष्ट्राच्या सुयश जाधवनं पॅरालिम्पिक स्पर्धेत पदकासाठी झुंज दिली, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 02:40 PM2021-09-01T14:40:55+5:302021-09-01T14:41:25+5:30
Tokyo Paralympics 2021 : भारताच्या सुयश जाधवनं ( Suyash Jadhav) पुरुषांच्या १०० मीटर ब्रिस्टस्ट्रोक SB7 गटाच्या अंतिम सामन्यात शर्तीनं प्रयत्न केले.
Tokyo Paralympics 2021 : भारताच्या सुयश जाधवनं ( Suyash Jadhav) पुरुषांच्या १०० मीटर ब्रिस्टस्ट्रोक SB7 गटाच्या अंतिम सामन्यात शर्तीनं प्रयत्न केले. पण त्याची कामगिरी अपात्र ठरवण्यात आली. त्याला अपात्र ठरल्यानं त्याच्या वेळेचीही नोंद केली गेली नाही. त्यानं एकापेक्षा अधिक फ्लाय किक मारल्यानं तांत्रिकदृष्ट्या त्याची कामगिरी अपात्र ठरवली गेली. कोलंबियाच्या कार्लोस झराटेनं १ मिनिट १२.१ सेकंदाच्या वेळेसह सुवर्णपदक जिंकले. रशियन समितीच्या इगोर इफ्रोसिनीन व ऑस्ट्रेलियाच्या ब्लॅक कोक्रेन यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले.
Tokyo Paralympics: Suyash Narayan Jadhav gets disqualified in Men's 100m breaststroke - SB7
— ANI Digital (@ani_digital) September 1, 2021
Read @ANI Story | https://t.co/sdsGXoc04u#TokyoParalympicspic.twitter.com/6CIhUhcn0x
सुयश मूळचा सोलापूर जिल्ह्यातल्या वेळापूरचा. सहावीला असताना भावाच्या लग्नात खेळताना सुयशच्या हातात असलेल्या खेळण्याचा विजेच्या प्रवाहाला स्पर्श झाला आणि काही क्षणात त्याने त्याचे दोनही हात अपघातात गमावले. काही काळ त्या अपघातामुळे त्याच्या आयुष्यात अंधार पसरलाही होता. पण त्यातून घरच्यांच्या इच्छाशक्तीच्या आणि आंतरिक उर्मीच्या जोरावर त्याने मात केली आणि नवा अध्याय रचला. त्याला खरं तर लहानपणापासून जलतरणाची आवड. त्याने वडील नारायण यांनी त्याला वयाच्या दुसऱ्या वर्षांपासून पोहायला शिकवले.
इतर मुलांच्या तुलनेत याचा पोहण्याचा वेग बघून क्रीडा शिक्षक असलेल्या त्याच्या वडिलांना मुलाचे पाय पाळण्यात दिसत होते. अनेक जिल्हा, राज्य पातळीवरील स्पर्धांमध्ये तो बक्षिसं मिळवत होता. अचानक अपघात झाला आणि जणू त्याच्या वाहत्या करिअरला खीळ बसली. पण त्याही परिस्थितीत कुटुंबीयांनी त्याला काहीही विशेष जाणवू दिल नाही. सर्वसामान्य मुलांप्रमाणे त्याला वाढवलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचा सराव सुरु ठेवला. इयत्ता ९वीत असताना त्याने पहिले राष्ट्रीय पदक मिळवले आणि त्यानंतर कधीही मागे वळून बघितले नाही. आज त्याने विविध गटात सुमारे १०५ पदकांवर नाव कोरले आहे. एकदा तर अंगात १०४ डिग्री ताप असताना तो टँकमध्ये उतरला आणि जिंकला सुद्धा !