Paralympics: नेमबाज अवनीची ऐतिहासिक कामगिरी; दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 08:46 AM2021-09-04T08:46:54+5:302021-09-04T08:47:17+5:30
पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने शुक्रवारपर्यंत आतापर्यंत सर्वाधिक १३ पदकांची कमाई केली.
टोकियो : पॅरालिम्पिकमध्ये अवनी लेखराने शुक्रवारी ऐतिहासिक कामगिरीसह दुसरे वैयक्तिक पदक जिंकले. एका स्पर्धेत दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू बनली. महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन एसएच१ स्पर्धेत तिने कांस्य पदक जिंकले. अंतिम फेरीत ४४५.९ गुणांसह ती तिसऱ्या स्थानावर राहिली.
पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने शुक्रवारपर्यंत आतापर्यंत सर्वाधिक १३ पदकांची कमाई केली. त्यात २ सुवर्ण, ६ रौप्य आणि ५ कांस्य पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेत चीनची झांग क्यूपिंग (४५७.९) आणि जर्मनीची हिलट्रॉप नताशा (४५७.१) या गुणांसह अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकण्यात यशस्वी ठरल्या. पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताचे हे १२ वे पदक ठरले.. भारताला या स्पर्धेत २ सुवर्ण, ६ रौप्य आणि चार कांस्य पदके मिळाली आहेत. १९ वर्षांच्या अवनीने सोमवारी दहा मीटर एअर रायफल प्रकारात नेमबाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले होते.
‘पहिल्या पॅरालिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणे शानदार ठरले. या दोन्ही माझ्या आवडत्या स्पर्धा आहेत. यासाठी अनेक महिने सराव केला. अखेरच्या शॉटमध्ये मी पूर्ण योगदान दिले. काही गोष्टी लक्ष विचलित करणाऱ्या होत्या, मात्र पुढच्या वेळी यापेक्षा चांगल्या कामगिरी करेन.’
- अवनी लेखरा