खेळाडूंच्या थकव्याकडे लक्ष द्यावे
By admin | Published: March 31, 2015 11:47 PM2015-03-31T23:47:30+5:302015-03-31T23:47:30+5:30
भारतीय क्रिकेट संघाच्या व्यस्त आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचा विचार करताना बीसीसीआयने खेळाडूंच्या थकव्याच्या मुद्यावर लक्ष देणे आवश्यक आहे,
कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाच्या व्यस्त आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचा विचार करताना बीसीसीआयने खेळाडूंच्या थकव्याच्या मुद्यावर लक्ष देणे आवश्यक आहे, असे मत माजी राष्ट्रीय निवड समिती सदस्य व्यंकटपती राजू यांनी व्यक्त केले. भारतीय संघाकडे गोलंदाजांची ‘बॅकअप टीम’ असणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
२०११ मध्ये विश्वविजेतेपदाचा मान मिळविणाऱ्या भारतीय संघाने अलीकडेच संपलेल्या विश्वकप स्पर्धेत शानदार कामगिरी केली. पण, उपांत्य फेरीत भारतीय संघाला आॅस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. आॅस्ट्रेलियाने या स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला. विश्वकप १९९२ व १९९६ मध्ये भारतीय संघाचे सदस्य असलेले व्यंकटपती राजू म्हणाले, की बीसीसीआयच्या योजनेमध्ये काही चुकीचे आहे, असे मला वाटत नाही. पण, ‘अ’ संघासाठी अधिक दौरे आयोजित होणे आवश्यक आहे. त्यामुळे युवा खेळाडूंची नवी फळी सज्ज राहील. पुढील
टी-२० विश्वकप स्पर्धा भारतात खेळली जाणार असून, राजू यांच्या मते, २००७ चा विश्व चॅम्पियन भारत पुन्हा एकदा जेतेपदाचा प्रबळ दावेदार राहील. राजू यांनी सांगितले, ‘‘भारतात होणाऱ्या टी-२० विश्वकप स्पर्धेत भारताकडून चमकदार कामगिरीची आशा राहील. भारतीय संघ पुन्हा कामगिरीत सातत्य राखत अव्वल चार संघांत स्थान मिळविण्यात यशस्वी ठरेल, असा मला विश्वास वाटतो.’’
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाची प्रशंसा करताना राजू यांनी सांगितले, ‘‘प्रत्येक कर्णधाराची खेळण्याची स्वतंत्र शैली असते. धोनी आपली शैली कायम ठेवतो आणि अनेकदा त्याच्यासाठी ही शैली उपयुक्त ठरते. टी-२० व वन-डे मध्ये भारतीय संघाला यश मिळवून देणारा तो खेळाडू आहे.’’
(वृत्तसंस्था)