कानपूर : कर्णधार सुरेश रैनाचे चमकदार अर्धशतक, ब्रॅडन मॅक्युलमची फटकेबाजी व ड्वेन स्मिथचा अष्टपैलू खेळ या जोरावर गुजरात लायन्सने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा ६ विकेट्सने धुव्वा उडवला. या विजयासह गुजरातने गुणतालिकेत अग्रस्थान मिळवत दिमाखात प्ले आॅफमध्ये प्रवेश केला. तर, मुंबईचे आव्हान मात्र संपुष्टात आले आहे.ग्रीन पार्क स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातने मुंबईला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. आक्रमक सुरुवातीनंतर फलंदाजी ढेपाळल्याने मुंबईकरांनी ८ बाद १७२ धावा अशी मजल मारली. गुजरातने १७.५ षटकांत ४ फलंदाजांच्या मोबदल्यात १७३ धावा काढल्या. अॅरोन फिंच शून्यावर बाद झाल्यानंतर मॅक्युलम - रैना यांनी ९६ धावांची भागीदारी करून संघाच्या विजयाचा पाया रचला. मॅक्युलम (२७ चेंडंूत ४८) बाद झाल्यानंतर रैनाने ३६ चेंडंूत ८ चौकार व २ षटकारांसह ५८ धावा काढून गुजरातला विजयी मार्गावर आणले. जसप्रीत बुमराहने रैनाला बाद करून मुंबईच्या आशा काही प्रमाणात पल्लवित केल्या. मात्र, स्मिथने फलंदाजीतही कमाल करताना २३ चेंडंूत नाबाद ३७ धावांचा तडाखा देत मुंबईचा पराभव निश्चित केला.तत्पूर्वी, कर्णधार रोहित शर्माच्या फटकेबाजीनंतर स्मिथ व धवल कुलकर्णीच्या अचूक गोलंदाजीपुढे मुंबईच्या धावसंख्येला खीळ बसली. धवलने रोहितला (३०) चौथ्या षटकात बाद केल्यानंतर स्मिथने ५व्या षटकात मार्टिन गुप्टील (७) व कृणाल पंड्या (४) यांना बाद करून मुंबईला मोठा धक्का दिला.मात्र, युवा नितीश राणाने ३६ चेंडंूत ७ चौकार व ४ षटकारांसह ७० धावा कुटल्या. त्याने जोस बटलरसह चौथ्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी करून मुंबईला सावरले. बटलर ३१ चेंडंूत ३३ धावा काढून परतला. यानंतर राणाही लगेच बाद झाल्याने पुन्हा मुंबईच्या धावांना ब्रेक लागला.
गुजरातचा दिमाखात प्ले आॅफ प्रवेश
By admin | Published: May 22, 2016 2:36 AM