टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं १ सुवर्ण, दौन रौप्य व ४ कांस्य अशी एकूण ७ पदकांची कमाई केली. नीरज चोप्रानं भालाफेकीत सुवर्ण जिंकून इतिहास घडवला, तर वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानू व कुस्तीपटू रवी कुमार दहिया यांनी रौप्यक्रांती घडवली. बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू, बॉक्सर लवलिना बोरगोईन, कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि पुरुष हॉकी संघानं कांस्टपदक जिंकले. ४१ वर्षांनंतर हॉकीत भारतानं ऑलिम्पिक पदक जिंकेल, तर सलग दोन ऑलिम्पिक पदक जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय महिला ठरली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंसोबत संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी प्रत्येक खेळाडूंसोबत गप्पा मारल्या. पदक जिंकलेल्या खेळाडूंचं कौतुक केलंच, शिवाय त्यांनी पदकाने हुलकावणी दिलेल्या खेळाडूंना मनोबल उंचावणारा कानमंत्र दिला. हा सर्व सोहळा पार पडल्यानंतर सोशल मीडियावर मोदींचा एक फोटो चर्चेचा विषय ठरत आहे. मोदींनी घातलेला गमछा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे आणि त्याला कारणही तसेच आहे. मोदींनी घातलेल्या या गमछावर ऑलिम्पिकपटूंची स्वाक्षरी आहे आणि त्यांच्या या कृतीचे सर्वांकडून कौतुक होत आहे.
'पंतप्रधान मोदींच्या ४-५ वर्षांच्या अथक परिश्रमामुळे नीरज चोप्रासारखे तरुण ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकताहेत!'
''नीरज चोप्रासारखे युवक ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकू शकले, ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील ४-५ वर्षांच्या अथक मेहनतीमुळे,''असा दावा केंद्रीय मंत्री देवूसिंह चौहान यांनी केला आहे. गुजरात येथील जन आशीर्वाद यात्रेला संबोधित करताना चौहान यांनी हे मत मांडले. ते म्हणाले,''भारतीय महिला खेळाडू पदक जिंकतात किंवा नीरज चोप्रासारखे तरुण ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकत आहेत... या खेळाडूंच्या मागे मोदी साहेब यांची ४-५ वर्षांचे अथक परिश्रम आहेत.''