मारहाण प्रकरणात ऑलिम्पिक पदक विजेत्या सुशील कुमार विरोधात पोलिसात FIR दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 10:17 AM2017-12-30T10:17:11+5:302017-12-30T10:20:38+5:30
ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार आणि त्याचा पारंपरिक प्रतिस्पर्धी मल्ल प्रवीण राणा समर्थकांमध्ये दिल्लीत झालेल्या हाणामारी प्रकरणी एफआयआर दाखल झाला आहे.
नवी दिल्ली - ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार आणि त्याचा पारंपरिक प्रतिस्पर्धी मल्ल प्रवीण राणा समर्थकांमध्ये दिल्लीत झालेल्या हाणामारी प्रकरणी एफआयआर दाखल झाला आहे. प्रवीण राणाला झालेल्या मारहाण प्रकरणी सुशील कुमार आणि त्याच्या समर्थकांविरोधात एफआयआर दाखल झाला आहे. डीसीपी एमएस रंधावा यांनी ही माहिती दिली. पोलिसांनी आयपीसीच्या कलम 323 आणि 341 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.
गोल्डकोस्ट राष्ट्रकुलसाठी शुक्रवारी इंदिरा गांधी इन्डोअर स्टेडियममध्ये निवड चाचणी रंगली होती. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषणसिंग यावेळी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय कुस्तीमध्ये पुनरागमन करणा-या सुशीलने स्वत:चे तिन्ही सामने जिंकले. पण उपांत्य लढतीत सुशीलकडून पराभूत होताच राणाने, सुशीलविरुद्ध खेळू नये यासाठी प्रतिस्पर्धी समर्थकांनी मला व माझ्या भावाला मारल्याचा दावा केला, शिवाय आगामी प्रो लीगमध्येही खेळण्याची चूक करू नकोस, अशी धमकी मिळाल्याचा आरोप केला.
Registered an FIR against wrestler Sushil Kumar and his supporters: DCP Central MS Randhawa on thrashing of wrestler Praveen Rana #Delhi
— ANI (@ANI) December 30, 2017
Police registered an FIR under sections 323 and 341 IPC in connection with thrashing of wrestler Praveen Rana allegedly by supporters of wrestler Sushil Kumar.
— ANI (@ANI) December 30, 2017
दुसरीकडे सुशीलने लढतीदरम्यान राणाने मारल्याचा आरोप केला. सुशील म्हणाला, ‘राणाने मला मारले पण मला रोखण्याचे त्याचे डावपेच असावेत. खेळाचा हा भाग असावा. याचा मी निषेध करतो. जे झाले ते चुकीचे होते पण मैदानाबाहेर आम्ही एकमेकांचा सन्मान करतो’.
अध्यक्ष बृजभूषण यांनी कानावर हात ठेवत म्हटले, ‘हे प्रकरण रिंगणाबाहेरचे आहे. मी ते पाहिलेले नाही. आम्ही दिल्ली पोलिसांकडे सुरक्षा मागितली होती, पण ती मिळाली नाही. वर्षभरापासून आम्हाला ही शंका होती. औपचारिक तक्रार मिळताच कारवाई होईल.’
सुशील राष्ट्रकुलसाठी पात्र
सुशीलकुमार आणि पाच अन्य पुरुष पहिलवानांनी पुढील वर्षी गोल्ड कोस्टमध्ये होणा-या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी आज क्वालिफाय केले आहे़ सुशील (७४ किलो) व्यतिरिक्त फ्री स्टाईलच्या अन्य पहिलवानांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी क्वालिफाय केले आहे़ यामध्ये राहुल आवारे (५७ किलो), बजरंग (६५ किलो), सोमवीर (८६ किलो), मौसम खत्री (९७ किलो) आणि सुमीत (१२५ किलो) यांचा समावेश आहे.
याआधी इंदूर येथे झालेल्या राष्ट्री़य कुस्ती स्पर्धेतही सुशील व प्रवीण आमनेसामने आले होते. मात्र, त्यावेळी प्रवीणने विरोध दर्शवताना सुशील कुमारला वॉकओव्हर दिला होता. या स्पर्धेत सुशीलने बाद फेरी न खेळताच सुवर्ण जिंकले होते.