- रोहित नाईकनवी दिल्ली : सॉफ्टबॉलचा आगामी टोकियो आॅलिम्पिकमध्ये समावेश झाला असला, तरी अद्याप या खेळाला भारतीय आॅलिम्पिक संघटनेने (आयओए) मान्यता दिली नसल्याने आम्हाला अडचणी येत आहेत. आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीची (आयओसी) खेळाला मान्यता मिळलेली असतानाही होत असलेल्या दिरंगाईमुळे दु:ख होत आहे. भारतीय सॉफ्टबॉल संघटनेला (एसएआय) ‘आयओए’ पूर्ण सदस्यत्व मिळाल्यास त्याचा खेळ व खेळाडूंना मोठा फायदा होईल, असे मत एसएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रवीण अनावकर यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.‘आयओसी’ने सॉफ्टबॉल खेळाला मान्यता दिल्यानंतर, आॅलिम्पिकच्या तयारीसाठी आवश्यक असलेल्या सुविधा मिळवण्याच्या दृष्टीने भारतीय सॉफ्टबॉल संघटनेने ‘आयओए’कडे पूर्ण सदस्यत्व मिळवण्यासाठी अर्ज केले; मात्र अद्याप त्यांना यामध्ये यश मिळालेले नाही. याविषयी अनावकर म्हणाले की, ‘आयओएचे सदस्यत्व मिळवण्यासाठी आमचे मोठे प्रयत्न सुरू असून ‘आयओसी’कडून मान्यता मिळालेली असताना होत असलेल्या दिरंगाईमुळे दु:ख होत आहे. ५- ६ महिन्यांपूर्वी ‘आयओसी’चे अध्यक्ष भारत दौऱ्यावर आले होते. त्यांनी आयओए अध्यक्षांसोबत चर्चा केल्यानंतर आम्ही पुन्हा अर्जही केला.’अनावकर पुढे म्हणाले की, ‘महत्त्वाचे म्हणजे पूर्ण सदस्यत्व नसल्याने प्रत्येक राज्याच्या खेळाडूला त्या-त्या राज्य सरकारकडून उपलब्ध असलेल्या सुविधा मिळत नाही. कायदेशीररीत्या आम्ही आयओएचे सदस्यपद मिळवण्यास पात्र आहोत; तसेच ‘आयओसी’च्या नियमाप्रमाणे जे खेळ आॅलिम्पिकमध्ये खेळले जातात, त्यांना राष्ट्रीय संघटनांनी मान्यता देणे भाग आहे. असे असतनाही दिरंगाई होत आहे. याचा आम्ही अनेकदा पाठपुरावाही केला; पण, ‘अद्याप या विषयावर विचार सुरूअसून, लवकरच निर्णय घेऊ’ असे आयओएकडून उत्तर मिळाले. असे असले तरी लवकरच आम्हाला पूर्ण सदस्यत्व मिळेल याची खात्री आहे.’राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळवण्यात येत असलेल्या अडचणींविषयी अनावकर म्हणाले की, ‘आयओसी ही मुख्य संस्था असून आयओए त्याला संलग्न आहे; पण केंद्र व राज्य सरकार या संस्थांच्या अंतर्गत येत नाही. भारतीय सॉफ्टबॉल संघटना केंद्र सरकारशी संलग्न आहे. असे असतानाही राज्य सरकार आयओएचे निर्णय मानते. याचाही मोठा फटका खेळाडूंना बसतो. मदत देताना राज्य सरकारने आयओसीचे नियम पाळले, तर खेळाडूंना योग्य मदत मिळू शकते. यामुळे नेमकी अडचण कुठे आहे तेच कळत नाही; शिवाय ‘आयओसी’ने सर्व राष्ट्रीय संघटनांना सूचित केले आहे की, एखादा खेळ आॅलिम्पिकमध्ये समाविष्ट झाला, तर त्या खेळाला तुम्ही मान्यता दिलीच पाहिजे. त्यामुळे लवकरच सॉफ्टबॉलला आयओएची मान्यता मिळेल अशी अपेक्षा आहे.’आॅलिम्पिकच्या दृष्टीने आमची जोमाने तयारी सुरू असून, आम्ही महत्त्वाच्या स्पर्धांमधून काही सर्वोत्तम खेळाडू निवडले आहेत. लवकरच या सर्व खेळाडूंची एक निवड चाचणी होईल आणि त्यातून भारताचा सर्वोतम संघ उभारण्यात येईल; शिवाय विशेष शिबिरही आयोजित करण्याच्या दृष्टीने आमचे नियोजन सुरू आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय अशा सर्व खेळाडूंमधून आम्ही सर्वोत्तम खेळाडूंची निवड करणार आहोत. सध्याचा महिना व्यस्त असल्याने अद्याप निवड चाचणीची तारीख व जागा ठरलेली नाही; पण याविषयी लवकरच माहिती देण्यात येईल.- डॉ. प्रवीण अनावकर, सीईओ - भारतीय सॉफ्टबॉल संघटना.
‘आयओए’च्या पूर्ण सदस्यत्वासाठी प्रयत्नशील- प्रवीण अनावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 3:09 AM