नवी दिल्ली - वीर मराठा टीमचा स्टार खेळाडू प्रवीण राणा याने प्रो रेसलिंग लीगच्या (पीडब्ल्यूएल) आगामी सीझनमध्ये दिल्ली सुल्तान्सच्या सुशील कुमार आणि युपी दंगलच्या अब्दुराखमोनोव बेकजोदचा पराभव करत आपला विजय आईला समर्पित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. प्रवीण राणाची आई सध्या कॅन्सरशी झुंज देत आहे. स्पर्धेसाठी आपण पुर्णपणे तयार असल्याचं प्रवीण राणाने सांगितलं आहे.
प्रवीण राणा आणि सुशील कुमार यांच्यात शुक्रवारी एशियन चॅम्पिअनशिप आणि कॉमनवेल्थ गेम्सच्या ट्रायलदरम्यान कुस्तीचा सामना झाला होता. यावेळी सुशीलने प्रवीणाचा 7-3 ने पराभव केला होता. कुस्तीदरम्यान आणि नंतर झालेल्या घटनांमुळे सध्या दोन्ही पेहलवानांमध्ये तणाव आहे. ऑलिम्पिक गेम्समध्ये भारतासाठी दोन वेळा मेडल जिंकलेल्या रेसलर सुशील कुमार आणि रेसलर प्रविण राणा यांच्या समर्थकांमध्ये शुक्रवारी तुफान हाणामारी झाली होती. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला होता. त्यामध्ये दोन्ही रेसलर्सचे समर्थक एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारत होते. या दोघांच्याही समर्थकांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहे.
प्रवीण राणा याने सांगितलं की, दक्षिण अफ्रिकेत कॉमनवेल्थ चॅम्पिअनशिपदरम्यान सुशील कुमारसोबत झालेल्या कुस्तीत मी चांगली खेळी केली होती. यावेळी त्याचा फक्त एका अंकाने पराभव झाला होता. पण या सामन्यानंतर सुशील कुमारचा पराभव केला जाऊ शकतो असा विश्वास प्रवीण राणामध्ये निर्माण झाला आहे.
ट्रायल सामन्यादरम्यान अंकांवरुन आपल्यासोबत भेदभाव झाल्याचं प्रवीण राणाने सांगितलं आहे. पण आता या भूतकाळातील गोष्टी झाल्याचंही तो बोलला आहे. 'कुस्तीदरम्यान आणि नंतर जे काही झालं ते दुर्भाग्यपूर्ण होतं. पण आता आपल्याला संपुर्ण लक्ष कुस्तीवर केंद्रीत करायचं आहे. प्रो रेसलिंग लीगमध्ये वीर मराठाच्या अपेक्षा फोल ठरवायच्या नाहीयेत', असं प्रवीण राणाने म्हटलं आहे.
'पीडब्ल्यूएलमधील आपल्या प्रदर्शनावरुन आपण योग्य दिशेने वाटचाल करत आहोत की नाही याचा अंदाज लावला जाऊ शकतो. दिवसाच्या शेवटी विजय सर्वस्व असतो आणि त्यासाठी आपण पुर्णपणे झोकून देऊ', असंही त्याने सांगितलं आहे.