आयपीएलमध्ये पुणे पुन्हा अपयशी
By admin | Published: May 12, 2016 02:49 AM2016-05-12T02:49:31+5:302016-05-12T02:49:31+5:30
यशस्वी कर्णधार ठरलेल्या कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीला रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाची मोट काही बांधताच आली नाही.
पुणे : भारतीय क्रिकेट संघाचा तसेच या पूर्वीच्या इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या सर्वहंगामात यशस्वी कर्णधार ठरलेल्या कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीला रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाची मोट काही बांधताच आली नाही. त्यामुळे
पुण्याचा संघ स्पर्धेत पुन्हा अपयशीच ठरला आहे.
या पूर्वी आयपीएलमध्ये २०११ साली पुणे वॉरियर्स हा संघ मिळाला. सहाराची मालकी असलेला हा संघ तीन हंगाम खेळला. मात्र नावाजलेले खेळाडू असून देखील संघाला आपला प्रभाव पाडता आला नाही. दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा पुणे शहराला रायझिंग पुणे सुपरजायंट्सच्या रूपाने आपला हक्काचा संघ मिळाला.
या संघाचे नेतृत्त्व भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार ठरलेल्या धोनीकडे देण्यात आले. या पूर्वी निलंबित चेन्नई सुपर किंग्ज संघाची धुरा धोणीवर होती. या संघासोबत असताना धोणीने अंतिम चार संघात प्रत्येक वेळी स्थान मिळविले. चेन्नईने २०१० व २०११ साली स्पर्र्धेचे जेतेपद संपादन केले. चॅम्पियन्स लीग देखील दोनदा जिंकली. तर चारदा उपविजेतेपद अशी धोणी ब्रिगेडची कामगिरी होती.
मुंबई इंडियन्स विरूद्धच्या सलामीच्या सामन्यात पुण्याने विजयी सुरूवात केली. मात्र त्यानंतरचे सलग चार सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर हैदराबाद सनरायझर्स विरुद्ध डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे विजय मिळाला. त्यानंतरचे दोन सामने गमावल्यानंतर दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध अखेरचा विजय मिळाला. त्यानंतर पुन्हा पराभवाची मालिका दहा मे रोजी झालेला हैदराबद विरुद्धच्या सामन्यापर्यंत कायम आहे. पुणे संघाने ११ सामन्यात ८ पराभव स्वीकारले आहेत. आता पुणे संघाचे दोन सामने शिल्लक असून १७ मे रोजी दिल्ली डेअरडेव्हिल्स, तर २१ मे रोजी किंग्ज इलेव्हन पंजाबशी लढत होईल. मात्र या दोन्ही सामन्यात विजय मिळविला तरी पुणे संघाला अंतिम चारात स्थान मिळविणे जवळपास अशक्य आहे.
रायझिंग पुणे संघ देखील कागदावर बलाढ्य आहे. अजिंक्य रहाणे, स्टीव्ह स्मिथ, केविन पीटरसन, फाफ डू प्लेसिस, आर. आश्विन या सारखे फलंदाज आहेत. दुखापतीमुळे प्लेसिस, स्मिथ, पीटरसन संघाबाहेर असल्याने पुण्याच्या डोकेदुखीत भरच पडली आहे. संघात ताळमेळ बसवण्यात अपयश येत असताना दुसरीकडे दुखापतीमुळे धोणीच्या अडचणीत भरच पडली. अजिंक्य रहाणेचा अपवाद वगळता कामगिरीत सातत्य ठेवण्याची किमया इतर फलंदाजांना करता आलेली नाही. हैदराबाद विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात अॅडम अॅडम झंपाने सहा बळी घेत लक्षवेधक कामगिरी केली आहे. मात्र अखेरच्या क्षणी झंपा अस्त्र पुण्याच्या भात्यात आले आहे.
संघाची गणिते नक्की कोठे चुकली याचा विचार संघव्यवस्थापन करेलच, मात्र या अपयशामुळे पुणे संघ
पुन्हा तळाशीच राहण्याची शक्यता
दाट आहे. (क्रीडा प्रतिनिधी)