विशाखापट्टणम : जगातील सर्वोत्तम फिनिशर म्हणून गणल्या जाणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकत रायझिंग पुणे सुपर जायंट्सने शनिवारी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा चार गडी राखून पराभव केला आणि आयपीएलच्या नवव्या पर्वात संघावरील अखेरच्या स्थानावर येण्याची नामुष्की टाळली. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १७२ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरात खेळताना पुणे संघातर्फे धोनीने अखेरच्या चेंडूवर षटकार खेचत संघाला ६ बाद १७३ धावांची मजल मारून देताना लक्ष्य गाठून दिले. एक वेळ पुणे संघाचा पराभव जवळजवळ निश्चित वाटत होता. त्यांना अखेरच्या षटकात विजयासाठी २३ धावांची गरज होती. अखेरच्या षटकात अक्षर पटेलचा पहिला चेंडू निर्धाव ठरला. त्यानंतरचा चेंडू वाईड होता. त्यानंतर धोनीने शानदार षटकार ठोकला तर पुढच्या चेंडूवर डीप कव्हरला हाशिम अमलाने अफलातून क्षेत्ररक्षण करीत चौकार रोखला. यावर धोनी व रविचंद्रन आश्विन यांनी धाव घेतली नाही. त्यानंतरच्या उर्वरित दोन चेंडूंवर धोनीने चौकार व षटकार वसूल केला. संघाला विजयासाठी अखेरच्या चेंडूवर षटकाराची गरज होती. पटेलच्या फुललेंथ चेंडूवर धोनीने मिडविकेटवरून षटकार ठोकत आपण जगातील सर्वोत्तम फिनिशर असल्याचे सिद्ध केले आणि टीकाकारांना चोख उत्तर दिले. या विजयामुळे आयपीएलमध्ये नव्याने समावेश करण्यात आलेल्या दोन संघांपैकी पुणे संघाने अखेरच्या स्थानावर राहण्याची नामुष्की टाळली. पुणे संघाने १४ सामन्यांत पाच विजय मिळवले असून, ९ सामन्यांत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आयपीएलच्या इतिहासात धोनीच्या नेतृत्वाखालील संघ स्पर्धेत प्लेआॅफमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरला. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलककिंग्ज पंजाब इलेव्हन : २० षटकांत ७ बाद १७२ धावा. मुरली विजय ५९, गुरकीरतसिंग ५१, हाशिम अमला ३०, गोलंदाजी : रविचंद्रन आश्विन ३४/४, डिंडा १६/१, परेरा २४/१, झम्पा ३२/१.रायझिंग पुणे सुपरजायंट्स : २० षटकांत ६ बाद १७३ धावा. महेंद्रसिंह धोनी नाबाद ६४, उस्मान ख्वाजा ३०, थिसारा परेरा २३, अजिंक्य रहाणे १९, सौरभ तिवारी १७. गुरकीरत २१/२, संदीप २९/१, मोहित ३९/१, एबोट ४३/१, धवन २१/१.
पुणे रायझिंग ठरला ‘सुपर’
By admin | Published: May 22, 2016 2:42 AM