पुण्याच्या सागर मारकडने मारला सुवर्ण चौकार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 08:34 AM2018-12-21T08:34:47+5:302018-12-21T08:35:38+5:30
महाराष्ट्र केसरी; ज्योतीबा, आशीषनेही मिळवले सुवर्ण
जालना : हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने व सळसळत्या चैतन्यपूर्ण वातावरणात पुण्याच्या सागर मारकड याने जालना येथील आझाद मैदानावर जबरदस्त कामगिरी करताना महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाचा चौकार मारला. सोलापूरचा ज्योतीबा अटकळे, अक्षय चोरगे व आशीष वावरे यांनीही आपआपल्या वजन गटात सुवर्णपदक जिंकताना उपस्थितांची मने जिंकली.
५७ किलोच्या माती गटातील अंतिम सामन्यात सागरने कोल्हापूरच्या संतोष हिरगुडे याला डोके वर काढण्याची उसंतही मिळू न देता सुरुवातीलाच दुहेरी पट काढून दोन गुण वसूल केले. त्यानंतर भारंदाज डावावर आणखी २ गुण वसूल करत सुवर्णपदकावर नाव कोरले. सागरचे हे चौथे सुवर्णपदक ठरले. याआधी त्याने अहमदनगर, वारजे, भूगाव येथेही सुवर्णपदक जिंकण्याचा भीमपराक्रम केला होता. प्रतिस्पर्ध्यांचे डाव व्हिडिओवर पाहून व्यूहरचना आखली असल्याची प्रतिक्रिया त्याने दिली.
ज्योतीबा अटकळे व सातारा येथील प्रवीण सूळ यांच्यातील ५७ किलो वजनी गादी अंतिम फेरीही रंगली. त्यात ज्योतीबाने दुहेरी पट काढताना प्रत्येकी २ गुण मिळवताना सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.
७९ किलो गादी अंतिम सामन्यात सोलापूरच्या आशीष वावरे व पुण्याच्या अक्षय चोरगे यांच्यातील लढत एकतर्फी ठरली. आशीषने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेत अक्षयला एकही संधी दिली नाही.