ऑनलाइन लोकमत -
विशाखापट्टणम, दि. 21 - प्ले ऑफ दौडीबाहेर झालेले दोन संघ किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रायजिंग पुणे सुपरजायंट्स आयपीलच्या मोसमातील शेवटचा सामना खेळत आहेत. पंजाबने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पंजाबने 20 ओव्हर्समध्ये 172 धावा करत पुण्यासमोर 173 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पंजाबकडून मुरली विजयने सर्वाधिक 59 धावा केल्या. दोन्ही संघाचा हा अखेरचा सामना असल्याने विजयासोबत निरोप घेण्याचा दोन्ही संघ प्रयत्न करतील. पुण्याकडून अश्विनने उत्तम गोलंदाजी करत 4 ओव्हर्समध्ये फक्त 34 धावा देत 4 विकेट्स घेतल्या.
पुणे संघाने होम ग्राऊंड असलेल्या याच मैदानावर दिल्ली डेअरडेव्हिल्सचा पराभव केला होता. पंजाबने मागचे दोन्ही सामने गमविले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबादने त्यांना नमविले होते. या सत्रातील चौथा आणि अखेरचा विजयदेखील पंजाबला याच मैदानावर मिळाला. त्यावेळी पंजाबने मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता. धोनीसाठी हा वेगळाच अनुभव आहे. याआधी सर्वच आयपीएलमध्ये त्याने चांगली कामगिरी केली होती. यंदा प्रथमच पुण्याकडून खेळला आणि अपयशी ठरला. पुण्याला सर्वाधिक फटका जखमी खेळाडूंचा बसला. केविन पीटरसन, स्टीव्हन स्मिथ, फाफ डु प्लेसिस व मिशेल मार्श हे सर्वजण संघातून अखेरपर्यंत खेळू शकले नाहीत. जखमी होऊन बाहेर पडलेल्या या खेळाडूंमुळे धोनीला अंतिम 11 जणांची निवड करणे कठीण गेले.