स्पेनचा स्टार राफेल नदाल आणि दानिल मेदवेदेव यांच्यातील ग्रँडस्लॅम अंतिम सामन्यामध्ये तब्बल पाच तासांचा खेळ रंगला. नदालने मेदवेदेव याला 7-5, 6-3, 5-7, 4-6, 6-4 अशा तीन विरुद्ध दोन सेटमध्ये पराभूत करत 19 वे ग्रँडस्लॅम नावावर केले. जगातील दोन नंबरच्या टेनिसपटूला पाचव्या क्रमांकावरील मेदवेदेवकडून कडवी झुंज मिळाली.
यंदाच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेमध्ये महिला गटात कॅनडाच्या १९ वर्षीय युवा टेनिसपटू बियांका आंद्रिस्कू हिने कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम उंचावताना दिग्गज सेरेनला धक्का देण्याचा पराक्रम केला. २३ ग्रँडस्लॅम वेजेतेपद पटकावलेल्या सेरेनाला संभाव्य विजेती मानले जात होते. किंबहुना तिचे २४वे जेतेपद जवळपास निश्चित मानले गेले होते, मात्र आंद्रिस्कूने दिग्गज सेरेनाच्या तगड्या आव्हानाचे कोणतेही दडपण न घेताना ६-३, ७-५ असा सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवत बाजी मारली. यासह आंद्रिस्कू गेल्या १५ वर्षांतील सर्वात युवा खेळाडू ठरली. याआधी रशियाच्या स्वेतलाना कुझनेत्सोवाने वयाच्या १९व्या वर्षीच यूएस ओपनचे जेतेपद पटकावले होते. सेरेनाचे विश्वविक्रमावला गवसणी घालण्याचे स्वप्न भंगले.
या निकालामुळे पुरुषांच्या गटातही काहीसा धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, नदालने ग्रँडस्लॅम जिंकल्याने रॉजर फेडररच्या 20 ग्रँडलस्लॅमच्या विक्रमापासून केवळ 1 पाऊल दूर आहे. मेदवेदेव 23 वर्षांचा असताना पहिल्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता.
पहिल्या दोन सेट मध्ये नदालने 7-5, 6-3 अशी बाजी मारली होती. यामुळे नदाल एकतर्फी जिंकत असल्याचे स्पष्ट होत होते. मात्र, नंतरच्या तिसऱ्या आणि चौथ्या सेटमध्ये मेदवेदेव याने कमबॅक करत अंतिम फेरीमध्ये चुरस निर्माण केली. यामुळे अवघ्या टेनिसप्रेमींचे शेवटच्या फेरीपर्यंत श्वास रोखले गेले होते. अखेर अंतिम सेटमध्ये 6-4 असा सेट जिंकत नदालने ग्रँडस्लॅम पटकावले.