पुणे पोलीस दलातील रवींद्र जगतापची अमेरिकेत 'सुवर्ण' कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2017 01:00 PM2017-08-10T13:00:33+5:302017-08-10T13:04:08+5:30
महाराष्ट्र पोलीस दलातील रवींद्र जगतापने 70 किलो फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात सुवर्णपदकाची कमाई करत अभिमानाने सर्वाची मान उंचावली आहे
कॅलिफोर्निया, दि. 10 - महाराष्ट्र पोलीस दलातील रवींद्र जगतापने अमेरिकेत सुवर्ण कामगिरी करत अभिमानाने सर्वाची मान उंचावली आहे. रवींद्र जगतापने अमेरिकेतील फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावत तिरंगा फडकावला आहे. अमेरिकेत सुरू असलेल्या विश्व पोलीस व फायर क्रीडा स्पर्धेत रवींद्र जगतापने ही मोलाची कामगिरी केली आहे. रवींद्र जगतापने 70 किलो फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. रवींद्र जगताप हा पुणे पोलिस दलात आहे.
विशेष म्हणजे रवींद्र जगतापने मिळवलेलं हे दुसरं पदक आहे. याआधी 71 किलोगटात ग्रीको रोमन प्रकारात रवींद्र जगतापने रौप्यपदक मिळवून दिले होते. त्यानंतर आता 70 किलो फ्रीस्टाईल कुस्तीत त्याने सुवर्ण पटकावलं आहे. दोन्ही कुस्ती प्रकारात पदकं मिळवून रवींद्र जगतापनं नवा इतिहास रचला आहे. याआधी हिंदकेसरी मारुती माने यांनी जाकार्ता येथील राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत अशीच दुहेरी कामगिरी केली होती.
याआधी बुधवारी भारतीय संघाला दोन सुवर्ण, एक रौप्यपदक मिळाले होते. कोल्हापूरच्या जयश्री बोरगी, मुंबईची सोनिया मोकल यांनी अॅथलेटिक्समध्ये सुवर्ण, तर रवींद्र जगताप याने कुस्तीत रौप्यपदक पटकाविले होते.
लॉस एंजिल्स येथे सुरू असलेल्या स्पर्धेत जयश्री बोरगी हिने 5 किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले होते. त्यापाठोपाठ सोनिया मोकल हिने 800 मीटर धावणे स्पर्धेत देशाला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले होते. 71 किलोगटात ग्रीको रोमन प्रकारात रवींद्र जगतापने रौप्यपदक मिळवून दिले होते.
सन 2015 मध्ये अमेरिकेतील फेअर फॅक्स राज्यातील व्हर्जिनिया येथे झालेल्या स्पर्धेत जयश्री बोरगी हिने 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. त्यासह तिने भारतीय पोलीस दलातील धावपटू रहमान याने नोंदविलेला ११:३१:२९ ही विक्रमी वेळही मोडत ११:०३:२१ अशी वेळ नोंदवत 5000 मीटर व 10000 मीटर धावण्यात सुवर्ण, तर 5000 मीटर चालण्यात रौप्यपदकाची कमाई केली होती. अशाप्रकारची कामगिरी करणारी ती पोलीस दलातील एकमेव महिला धावपटू ठरली आहे.