कोलकाता : भारीभक्कम फलंदाजीक्रम लाभलेला ‘स्टार स्टडेड’ रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला आयपीएलमध्ये शनिवारी गतचॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध कठीण चॅलेंज स्वीकारावे लागणार आहे.गेल्या तीन पर्वांत दोनदा जेतेपदाचा शिरपेच खोवणाऱ्या केकेआरने २०१४ पासून आतापर्यंत सलग १४ सामने जिंकले आहेत. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील संघाला नमविणे इतरांसाठी फार कठीण होऊन बसले आहे.आरसीबीकडे कर्णधार विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सच्या रूपात आक्रमक फलंदाज आहेत, तर दुसरीकडे कोलकाता संघात जो ताळमेळ दिसतो त्याला पर्याय नाही. मुंबईविरुद्ध पहिल्याच सामन्यात केकेआरकडून द. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मोर्नी मॉर्केल याने १८ धावांत दोन गडी बाद केले. गंभीरने ५७, मनीष पांडे ४० आणि सूर्यकुमार यादवने नाबाद ४६ धावांचे योगदान देत विजय साकार केला होता.कर्णधार विराटच्या नेतृत्वाखाली बेंगळुरुची फलंदाजी भक्कम असली तरी ईडनगार्डनवर विजयासाठी या संघाला मोठा घाम गाळावा लागणार आहे. कोहलीसह डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल हे फलंदाजीत आकर्षण आहेत, पण त्यांची बॅट कशी तळपते, यावर विजयाचे समीकरण विसंबून राहील. आरसीबी २००९ आणि २०११ चा उपविजेता आहे. मिशेल स्टार्क आणि न्यूझीलंडचा अॅडम मिल्ने यांच्या अनुपस्थितीत या संघाची गोलंदाजी काहीशी कमकुवत वाटते. आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज सीन एबोट, अशोक डिंडा आणि वरुण अॅरॉन हे वेगवान मारा सांभाळतील, तर फिरकीची जबाबदारी यजुवेंद्र चहल आणि इक्बाल अब्दुल्ला यांच्या खांद्यावर असेल. (वृत्तसंस्था)
रॉयल चॅलेंजर्सला केकेआरचे चॅलेंज
By admin | Published: April 11, 2015 4:32 AM