द. आशियाई क्रीडा : भारतीय तायक्वांदो संघाला मिळणार संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 03:26 AM2019-11-27T03:26:04+5:302019-11-27T03:26:56+5:30
आंतरराष्ट्रीय ऑलिंम्पिक समितीच्या (आयओसी) हस्तक्षेपामुळे भारतीय तायक्वांदो संघाला पुढील महिन्यात नेपाळमध्ये होणाऱ्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय ऑलिंम्पिक समितीच्या (आयओसी) हस्तक्षेपामुळे भारतीय तायक्वांदो संघाला पुढील महिन्यात नेपाळमध्ये होणाऱ्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. आयओसीने या स्पर्धा आयोजकांना भारताला या स्पर्धेत सहभागी करुन घेण्यास परवानगी देण्यास सांगितले.
नेपाळ ऑलिम्पिक समितीने २३ नोव्हेंबर रोजी होणा-या या महत्त्वाच्या स्पर्धेत भारताच्या तिरंदाजी, तायक्वांदो व कराटे संघाला सहभाग नाकारला होता. या सर्व क्रीडा प्रकाराच्या संघटनांवर आयओसीने निलंबनाची कारवाई केल्यामुळे आम्ही असे केले आहे, असे नेपाळचे म्हणणे होते. त्याचवेळी, तायक्वांदो खेळाच्या जागतिक संघटनेने मात्र भारतीय संघाला या स्पर्धेत सहभागी होण्यास परवानगी देण्याची विनंती केली होती. त्यानंतर आता भारतीय तायक्वांदो संघाच्या सहभागाचा मार्ग मोकळा झाला आहे. (वृत्तसंस्था)