मलेशिया : इंडियन ओपन चॅम्पियन सायना नेहवाल आणि के. श्रीकांतने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून मलेशिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत नंबर वनवर विराजमान झालेल्या सायनाने महिला एकेरीत इंडोनेशियाच्या मारिया फेबेला दोन सेटमध्ये २१-१३, २१-१६ गुणांनी नमविले. सायनाचा पुढील सामना चीनची क्वालिफायर याओ हूएविरुद्ध होईल. दुसरीकडे पुरुषांच्या एकेरीत भारताच्या के. श्रीकांतने २०१० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कास्यपदकविजेत्या इंग्लंडच्या राजीय ओसेफला तीन गेममध्ये २१-१०, १५-२१, २४-२२ गुणांनी पराभूत केले. गतवर्षी श्रीकांतने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत राजीवला पराभूत केले होते. श्रीकांतचा दुसऱ्या फेरीत १६ वा मानांकित चिनच्या तियान हूवेइविरुद्ध होणार आहे. पहिल्या गेममध्ये सुरुवातीला श्रीकांतने आघाडी घेतली होती. पण नंतर राजीवने काही चांगल्या प्लेसिंग करीत गुण मिळवीत ७-७ अशी बरोबरीनंतर त्याने सलग १० गुण संपादन केले. गुणफरकात जास्त अंतर केल्यानंतर श्रीकांतने आपल्या खेळातील सातत्य कायम राखत शेवटी गेम २१-१० अशी जिंकली. दुसऱ्या गेममध्येसुद्धा श्रीकांतने ६-० अशी आघाडी घेतली होेती. नंतर श्रीकांत आपल्या खेळातील लय राखू शकला नाही आणि गेम १५-२१ अशी गमवावी लागली. तिसऱ्या गेम अटीतटीची झाली. दोन्ही खेळाडू गुणांसाठी प्रयत्नांची शिकस्त करीत होते. श्रीकांत ३-७ गुणांनी पिछाडीवर असताना त्याने अफलातून खेळाचे प्रदर्शन करीत आघाडी तर घेतलीच. नंतर राजीवनेसुद्धा बरोबरी साधली. पण शेवटी श्रीकांतने २४-२२ गुणांनी लढती जिंकली. फॉर्मात असलेल्या श्रीकांतने गतवर्षी नोव्हेंबरमध्ये चायना ओपन सुपर सिरीजचे विजेतेपद जिंकले होते. त्यानंतर हॉँगकॉँग ओपन स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. जागतिक सुपर सिरीजमध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता. सय्यद मोदी ग्रांप्री गोल्ड स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर इंडिया सुपर सिरीजजे विजेतेपद आपल्या नावावर केले होत. सायनाने जानेवारीमध्ये सय्यद मोदी ग्रांप्रीचे विजेतेपद जिंकल्यानंतर आॅल इंग्लंड स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली होती. त्यांनतर थायलंडच्या रेचानोक इंतानोनचा पराभव करून इंडिया ओपनचे विजेतेपद जिंकले. (वृत्तसंस्था)
सायना, श्रीकांत दुस-या फेरीत
By admin | Published: April 02, 2015 1:40 AM