सरितादेवी, मेरीकोम उपांत्य फेरीत दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 12:39 AM2018-09-14T00:39:11+5:302018-09-14T00:39:29+5:30
पोलंडमधील स्पर्धेत दोन पदके निश्चित
नवी दिल्ली : एल. सरितादेवी आणि अनुभवी बॉक्सर एमसी मेरीकोम यांनी उपांत्य फेरीत धडक देताच पोलंडमधील गिलवाईस येथे सुरू असलेल्या महिलांच्या १३ व्या आंतरराष्टÑीय बॉक्सिंग स्पर्धेत भारताची दोन पदके निश्चित झाली आहेत.
माजी विश्व विजेती आणि आशियाई क्रीडा स्पर्धेची कांस्य विजेती सरिताने ६० किलो वजन गटात बुधवारी रात्री झेक प्रजासत्ताकची एलेना चेकी हिच्यावर ५-० ने एकतर्फी विजय नोंदविला. उपांत्य सामन्यात सरिताला कझाखस्तानची करिना इब्रागिमोवाविरुद्ध खेळावे लागेल.
पाचवेळेची माजी विश्वविजेती आणि आॅलिम्पिक कांस्य विजेती एमसी मेरीकोम हिने रिंकवर हजेरी लावण्याआधीच ४८ किलो गटाच्या लाईट फ्लायवेट प्रकाराची उपांत्य फेरी गाठली. फिटनेसमुळे मेरीकोम नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झाली नव्हती.
अन्य खेळाडूंमध्ये रितू ग्रेवालने रशियाची स्वेतलाना रोजाविरुद्ध ४-१ ने विजय नोंदवून ५१ किलो गटाची उपांत्य फेरी गाठली. लवलीना बोरगोहेन ही देखील झेक प्रजास्ताकाची मार्टिना श्मोरानजोवाविरुद्ध विजय नोंदवून उपांत्य फेरीत दाखल झाली. ८१ किलोपेक्षा अधिक वजन प्रकारात सीमा पुनिया, ६४ किलो गटात प्विलाओ बासुमैत्री आणि शशी चोप्रा यांनी आपापल्या लढती गमावल्याने स्पर्धेबाहेर पडल्या. सीमा कझाखस्तानची लजात कुंगेबायेवाकडून ०-५ ने पराभूत झाली. बासुमैत्रीला पोलंडच्या तसेच शशीला इंग्लंडच्या खेळाडूने धूळ चारली.
ज्युनियर गटात राज साहिबा(७० किलो) हिने पोलंडची बार्बरा मार्सिनकोवस्कावर ५-० ने आणि नेहाने ७५ किलो गटात दारिया परादावर ५-० ने विजय साजरा केला. कोमलने ८० किलो गटात मार्टिना जान्सलेविजचा ३-२ ने पराभव केला. (वृत्तसंस्था)