राज्यस्तरीय कबड्डी : शिवशक्ती क्रीडा मंडळाचा जेतेपदाचा षटकार, पुरुष गटात चेंबूर क्रीडा केंद्र विजयी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 08:43 AM2019-05-07T08:43:26+5:302019-05-07T08:44:00+5:30

पुरुष गटात चेंबूर क्रीडा केंद्र मुंबईने बाजी मारली

Shivshakti Sports Club and Chembur Sports Center wins title in Mavali Mandal State level Kabaddi | राज्यस्तरीय कबड्डी : शिवशक्ती क्रीडा मंडळाचा जेतेपदाचा षटकार, पुरुष गटात चेंबूर क्रीडा केंद्र विजयी

छायाः विशाल हळदे

googlenewsNext

ठाणे : श्री मावळी मंडळ ठाणे आयोजीत ६८ व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या पुरुष गटातील अंतिम विजेतेपद चेंबूर क्रीडा केंद्र मुंबई उपनगर या संघाने मिळवले, तर महिला गटात शिवशक्ती क्रीडा मंडळ मुंबई शहर या संघाने  सलग सहाव्यांदा  अंतिम विजेतेपद  मिळवले.


पुरुष गटातील अंतिम विजेतेपदाच्या लढतीत मुंबई उपनगरच्या चेंबूर क्रीडा केंद्र संघाने ठाण्याच्या छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळ संघावर अतिशय रोमहर्षक लढतीत ३२-२९ अशी ३ गुणांनी मात करून अंतिम विजेतेपद मिळवले.  सदर सामन्यात छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळाने ओलीसुकी जिंकून मैदानाची निवड केली. सामन्यातील पहिली चढाई  चेंबूर क्रीडा केंद्र संघाच्या आकाश कदमने केली व पहिल्या चढाईतच आपल्या संघाचे गुणांचे खाते उघडले. त्याचप्रमाणे  छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळाच्या शुभम शिर्केने सुध्दा पहिल्या चढाईतच गुण मिळवला. त्यानंतर छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळाच्या  शुभम शिर्केने आपल्या संघाला सलग तीन गुण मिळवून दिले व पहिल्या पाच मिनिटातच चेंबूर क्रीडा केंद्र संघावर लोण पडणार असे वाटत असतानाच चेंबूर क्रीडा केंद्र संघाच्या  गुफरान खानने खोलवर चढाई करीत आपल्या संघाला १ गुण मिळवून दिला व आपल्या संघावर पडणारा लोण  छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळावर उलटवला.

मध्यंतराला चेंबूर क्रीडा केंद्र संघाकडे १५-१० अशी ५ गुणांची आघाडी होती. मध्यंतरानंतर मात्र  छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळाच्या शुभम शिर्केने एकाच चढाईत चार गुण मिळवत  चेंबूर क्रीडा केंद्रावर लोण टाकीत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. सामना संपायला शेवटची पाच मिनिटे शिल्लक असताना छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळाने २४-२३ अशी १ गुणांची आघाडी घेतली. नंतर मात्र दोन्ही संघानी आपला अनुभव पणाला लावून अतिशय सुंदर खेळ करीत सामना रंगतदार केला.  चेंबूर क्रीडा केंद्र संघाच्या विजयात विराज कदमचा सिंह ह्याचा वाटा होता. छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळाच्या शुभम शिर्के व अर्जुन शिंदे यांनी शेवटपर्यंत झुंज दिली मात्र ते आपल्या संघाचा पराभव टाळू शकले नाहीत     

महिला गटातील अंतिम सामन्यात मुंबई शहरच्या शिवशक्ती क्रीडा मंडळाने मुंबई उपनगरच्या संघर्ष क्रीडा मंडळावर ३६-२८ असा ८ गुणांनी विजय मिळवला.  शिवशक्ती क्रीडा मंडळाने ओलीसुकी जिंकून मैदानाची निवड केली. सामन्यातील पहिली चढाई  संघर्ष क्रीडा मंडळाच्या कोमल देवकर हिने केली व बोनस गुण मिळवत पहिल्या चढाईतच आपल्या संघाला गुण मिळवून दिला.  संघर्ष क्रीडा मंडळाच्या प्रणाली नागदेवतेची पक्कड करून पूजा जाधव हिने शिवशक्ती क्रीडा मंडळाचे गुणांचे खाते उघडले. सदर सामना सुरुवातीला चुरशीचा होता. दोन्ही संघातील खेळाडू आपल्या संघाला गुण मिळवून देण्यासाठी निकराचे प्रयत्न करीत होते.

मध्यंतराला शिवशक्ती क्रीडा मंडळाकडे १८-१४ अशी ४ गुणांची आघाडी होती. मध्यंतरानंतर मात्र  शिवशक्ती क्रीडा मंडळाच्या ज्योती डफळेने बोनस गुण मिळवीत आपल्या संघाची गुणसंख्या वाढवली. तिला प्रतीक्षा तांडेल हिने सुंदर साथ दिली. संघर्ष क्रीडा मंडळाच्या कोमल देवकर  व प्रणाली नागदेवते यांनी आपल्या संघाचा पराभव टाळण्यासाठी खूप प्रयत्न केला. पण, आपल्या संघाचा पराभव टाळू शकल्या नाहीत.   


पुरुष गटातील मानकरी 

सूर्वोत्कृष्ट खेळाडू : आकाश कदम  (चेंबूर क्रीडा केंद्र, मुंबई उपनगर)
उत्कृष्ट खेळाडू : शुभम शिर्के (छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळ, ठाणे)
उत्कुष्ट पक्कड : गुफरान शेख  (चेंबूर क्रीडा केंद्र, मुंबई उपनगर)
अंतिम दिवसाचा (०६/०५) उत्कृष्ट खेळाडू :  सुयोग राजापकर (स्वस्तिक क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर)
तिसऱ्या दिवसाचा (०५/०५) उत्कृष्ट खेळाडू : अनिकेत चिकणे (जय शिव क्रीडा मंडळ, ठाणे)

महिला  गटातील मानकरी 
सूर्वोत्कृष्ट खेळाडू  : ज्योती डफळे (शिवशक्ती क्रीडा मंडळ, मुंबई शहर)
उत्कृष्ट खेळाडू : पूजा जाधव  (संघर्ष क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर)
उत्कुष्ट पक्कड : प्रणाली नागदेवते (संघर्ष क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर)
अंतिम दिवसाचा (०६/०५) उत्कृष्ट खेळाडू : कोमल देवकर  (संघर्ष क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर)
तिसऱ्या दिवसाचा (०५/०५) उत्कृष्ट खेळाडू : बेबी जाधव (नवशक्ती क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर)

Web Title: Shivshakti Sports Club and Chembur Sports Center wins title in Mavali Mandal State level Kabaddi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.