नवी दिल्ली - जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून देणा-या हिमा दासचे प्रशिक्षक निपूण दास यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. गुवाहाटी येथे प्रशिक्षण देणा-या निपूण दासवर अन्य खेळाडूने हा आरोप केला आहे. ' निपूण यांच्यावर आरोप झाले असल्याचे वृत्त खरे आहे आणि आम्ही तपास करत आहोत,' अशी माहिती आसामचे क्रीडा व युवक कल्याण विभागाचे आयुक्त आशुतोष अग्निहोत्री यांनी दिली.
दास यांच्यावर आरोप करणा-या खेळाडूने आंतरशालेय राष्ट्रीय स्पर्धेत आसामचे प्रतिनिधीत्व केले आहे. गुवाहाटी येथील स्टेडियममध्ये लैंगिक शोषण झाल्याचा दावा त्या खेळाडूने केला आहे. तसेच याबाबत कुणालाही सांगितल्यास सराव सत्रातून व महत्त्वाच्या स्पर्धेतून वगळण्याची धमकी दास देत असल्याचा दावाही तिने केला. पिडीत मुलीच्या घरच्यांनी 22 जूनला बसिष्ठा पोलीस चौकीत तक्रार दाखल केली आहे. एफआयआरमध्ये कलम 342, 354, 376, 511 आणि 506 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दास यांना एका दिवसाच्या कारागृहानंतर जामीन मिळाला होता.
मागील महिन्यात हिमाने 20 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत ही विक्रमी कामगिरी केली. आसामच्या हिमाने 51.46 सेकंदाची वेळ नोंदवून 400 मीटर शर्यतीत सुवर्णपदक नावावर केले. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आणि त्याशिवाय ट्रॅक प्रकारातील भारताचे हे पहिलेच सुवर्ण ठरले. त्यानंतर निपूण दास यांनाही प्रसिद्धी मिळाली.