मुंबई : विलेपार्लेच्या सिया देवरुखकर हिने नुकत्याच राजकोट येथे झालेल्या ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली. राष्ट्रीय स्तरावरील सियाचे हे पहिले पदक ठरले.
विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात सिया जलतरणाचा सराव करते. यावेळी स्पर्धेत या संकुलाच्या क्षमा बंगेरा (१५ वर्षांखालील, हायबोर्ड डायव्हिंग) जिया शाह (१३ वर्षांखालील, १ मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग) आणि अनुज शहा (१८ वर्षांखालील, ३ मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग) यांनीही आपापल्या प्रकारात कांस्य पटकावले.
राजकोट येथील सरदार वल्लभभाई पटेल जलतरण तलाव येथे पार पडलेल्या या स्पर्धेत सियाने ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात छाप पाडताना ४२.०४ सेकंदाची वेळ नोंदवत अंतिम फेरी गाठली. यानंतर काही तासांनी झालेल्या अंतिम फेरीत तिने ४२.३० सेकंदाची वेळ नोंदवत कांस्य पदकावर नाव कोरले. आसामच्या पाही बोरा (४२.०४) आणि दिल्लीच्या प्रकृती दहीया (४२.२८) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदकावर कब्जा केला.