जपान ओपन बॅडमिंटन; सिंधू, साई प्रणित उपांत्यपूर्व फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 03:07 AM2019-07-26T03:07:23+5:302019-07-26T10:09:20+5:30
डेन्मार्कच्या रॅस्मस गेमकेने त्याला २१-९, २१-१५ असे नमविले. प्रणॉयने सलामीला श्रीकांतला १३-२१, २१-११, २२-२० असा धक्का दिला होता.
टोकियो : स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू आणि बी साई प्रणित यांनी गुरुवारी जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पाचवी मानांकित सिंधूने तासभर चाललेल्या सामन्यात जपानच्या आया ओहोरी हिला ११-२१, २१-१०, २१-१३ असे पराभूत केले. सिंधूला पहिला गेम गमवावा लागला, पण त्यानंतर तिने दमदार पुनरागमन करीत सामना जिंकला. सिंधूला पुढील फेरीत चीनची चेन शियाओ आणि जपानचे चौथी मानांकित अकाने यामागुची यांच्यातील विजेत्याविरुद्ध सामना खेळावा लागणार आहे. प्रणित उपांत्यपूर्व लढतीत इंडोनेशियाचा टॉमी सुगियातो याच्याविरुद्ध खेळणार आहे.
साई प्रणितने ४५ मिनिटांच्या संघर्षात कांता त्सुनेयमाला २१-१३, २१-१६ असे पराभूत केले. किदाम्बी श्रीकांतला पहिल्याच फेरीत पराभूत करणाऱ्या एच. एस. प्रणॉयला, मात्र दुसºया फेरीत पॅकअप करावे लागले. डेन्मार्कच्या रॅस्मस गेमकेने त्याला २१-९, २१-१५ असे नमविले. प्रणॉयने सलामीला श्रीकांतला १३-२१, २१-११, २२-२० असा धक्का दिला होता.
दुसरीकडे डेन्मार्कच्या अँडर्स अँटोन्सनने भारताचा समीर वर्मावर २१-१७, २१-१२ अशी मात केली होती. पुरुष दुहेरीत मनू अत्री आणि सुमित बी. रेड्डी जोडीचे आव्हान संपुष्टात आले. मलेशियाच्या गोह शे फेई व नूर इझुद्दीन जोडीने त्यांचा २१-१२, २१-१६ असा पराभव केला.
पुरुष दुहेरीत भारतीयांची विजयी कूच
पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीने ५३ मिनिटात विजय नोंदवून उपांत्यपूर्व फेरी गाठली. पहिल्या गेममध्ये माघारल्यानंतरही मुसंडी मारणाºया भारतीय खेळाडूंनी काय शियांग हुआंग- चेंग ल्यू यांच्यावर १५-२१, २१-११,२१-१९ अशा फरकाने मात केली. सात्विक साईराज आणि अश्विनी पोनप्पा या मिश्र जोडीला थायलंडच्या जोडीकडून १६-२१, १७-२१ ने पराभवाचा धक्का बसताच त्यांना बाहेर पडावे लागले.