दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील कबड्डीतभारतीय महिलांचा सलग दुसरा, तर पुरुषांची विजयी सुरुवात. एपीएफ हॉल, हल चौक, काठमांडू, नेपाळ येथे सुरू झालेल्या या स्पर्धेतील सकाळच्या सत्रात झालेल्या पुरुषांच्या सत्रात भारताने श्रीलंकेला ४९-१६ अशी धूळ चारत साखळीतील पहिल्या विजयाची नोंद केली. मध्यांतराला २५-०८अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या भारतीयांनी मध्यांतरानंतर देखील त्याच जोशात खेळ करीत हा विजय सोपा केला.
महिलांत भारतीयांनी बांगला देशवर ४७-१६ अशी सहज मात करीत साखळीत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. शेवटची पाच मिनिटे पुकारली तेव्हा ३९-१४ अशी भारताकडे आघाडी होती. भारताचा आता यजमान नेपाळ संघा बरोबरचा साखळीतील शेवटचा सामना बाकी आहे.
पुरुषांच्या इतर सामन्यात पहिल्या साखळी सामन्यात पराभूत झालेल्या पाकिस्तानने बांगला देशवर ३७-२१ अशी मात करीत पहिल्या विजयाची नोंद केली. तर बांगला देशने नेपाळवर ४३-१५ अशी मात करीत आपल्या आशा जिवंत ठेवल्या. महिलांच्या दुसऱ्या साखळी सामन्यात यजमान नेपाळने श्रीलंकेला २८-२४ असे पराभूत करीत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. त्यांना आजचा हा साखळीतील दुसरा विजय. आता त्यांना साखळीतील एक सामना बाकी आहे. तो भारता बरोबर गट विजेते व उपविजेते या करिता होईल. त्यामुळे हेच दोन्ही संघ अंतिम फेरीत एकमेकां समोर उभे ठाकतील.