जळगांव : येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने व जळगांव जिल्हा खो-खो असोसिएशन आयोजित ३५ व्या किशोर-किशोरी (१४ वर्षाखालील) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचे बिगुल उद्या (दि ६ डिसें) रोजी वाजणार आहे. या स्पर्धेत २४ जिल्ह्यांचे किशोर-किशोरी संघ सहभागी होणार आहेत. या चारदिवसीय स्पर्धेचे अंतिम सामने ९ डिसें रोजी पार पडतील. स्पर्धेतील सामने सकाळ व सायंकाळच्या सत्रात प्रकाशझोतात खेळवण्यात येतील. प्रथम साखळी व तदनंतर बाद पद्धतीने खेळवल्या जाणा-या यास्पर्धेत महाराष्ट्रातील बाल खेळाडूंचा रंगतदार खो-खो खेळ पहाण्याची संधी जळगावकरांना लाभणार आहे. दि.१५ ते १९ डिसें या कालावधीत उत्तराखंडातील रूद्रपूर येथे आयोजित २९व्या किशोर-किशोरी गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेकरीता या स्पर्धेतून महाराष्ट्राचे संघ निवडण्यात येणार असल्याने स्पर्धेतील सामने अत्यंत चुरशीचे होतील.
गतवर्षीच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत किशोर गटात सोलापूर तर किशोरी गटात पुण्याने पटकावलेले विजेतेपद यावर्षी देखील हे संघ राखू शकतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. स्पर्धेकरीता जय्यत तयारी चालू असून तीन मैदाने (कोर्ट) व सुसज्ज प्रेक्षक गॅलेरीची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात येत आहे.
स्पर्धेची गटवारी खालील प्रमाणे :
किशोर विभाग:अ गट: सोलापूर, बीड, धुळेब गट: पुणे, परभणी, लातूरक गटः मुंबई उपनगर, मुंबई, नंदूरबारड गट: सांगली, रत्नागिरी, जळगांवइ गटः औरंगाबाद,रायगड,सिंधुदुर्गफ गट:अहमदनगर, नाशिक,जालनाग गट: ठाणे,पालघर,हिंगोलीह गटःउस्मानाबाद, सातारा, नांदेड
किशोरी विभाग :अ गट: पुणे,लातूर,रायगडब गट:उस्मानाबाद,मुंबई उपनगर,सिंधुदुर्गक गटःनाशिक,जळगांव,धुळेड गट:सोलापूर,जालना,परभणीइ गटःअहमदनगर,मुंबई,बीडफ गट:सातारा,ठाणे,हिंगोलीग गट:पालघर,रत्नागिरी,नांदेडह गटःसांगली,औरंगाबाद,नंदुरबार