राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : बँक ऑफ बडोदा, न्यू इंडिया एशोरन्स बाद फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 03:14 PM2020-02-15T15:14:58+5:302020-02-15T15:16:32+5:30

बँक ऑफ बडोदाने चुरशीच्या लढतीत महाराष्ट्र बँकेचे आव्हान २३-२१ असे मोडून काढत या गटात अग्रक्रम मिळवून बाद फेरी गाठली.

State level Kabaddi competition: Bank of Baroda, New India Assurance in the knock out round | राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : बँक ऑफ बडोदा, न्यू इंडिया एशोरन्स बाद फेरीत

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : बँक ऑफ बडोदा, न्यू इंडिया एशोरन्स बाद फेरीत

Next

बँक ऑफ बडोदा,  न्यू इंडिया एशोरन्स, मुंबई बंदर, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण यांची महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आयोजित “रौप्यमहोत्सवी” शहरी पुरुष व्यावसायिक गटाच्या बाद फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्र राज्य व मुंबई शहर कबड्डी असो.च्या सहकार्याने मुंबईतील हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन येथील मैदानावर सुरू असलेल्या शहरी व्यावसायिक पुरुषांच्या ब गटात बँक ऑफ बडोदाने चुरशीच्या लढतीत महाराष्ट्र बँकेचे आव्हान २३-२१ असे मोडून काढत या गटात अग्रक्रम मिळवून बाद फेरी गाठली. नितीन देशमुख, जितेश पाटील यांनी सुरुवात जोरदार करीत विश्रांतीला १७-११ अशी आघाडी घेतली. पण विश्रांतीनंतर महाबँकेच्या प्रवीण रहाटे, राकेश गायकवाड यांना सूर सापडल्याने सामन्यात चुरस निर्माण झाली, पण सामन्याचा निर्णयात फरक पडला नाही. गटात उपविजेतेपद मिळवीत महाबँकेने देखील बाद फेरी गाठली.

   अ गटात गतविजेत्या मुंबई बंदरने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचा ४७-१२ असा धुव्वा उडवीत बाद फेरी गाठली. शुभम कुंभार, स्वप्नील पाटील यांच्या धुव्वादार खेळाला या विजयाचे श्रेय जाते. परिवहन मंडळाचे संदेश उरणकर, रोहित आमरे यांचा खेळ बरा होता. क गटात न्यू इंडिया एश्योरंसने शिवडीच्या भारत पेट्रोलीयमचा ४१-२५ असा पाडाव करीत आगेकूच केली. मध्यांतराला ३१-०६ अशी आघाडी मिळविणाऱ्या न्यू इंडियाने नंतर सावध व संथ खेळ करीत हा विजय साकारला.  कुलदीप माहिल, केतन कळवनकर यांचा उत्कृष्ट खेळ या विजयात महत्वाचा ठरला. पेट्रोलीयमचा धीरज तरे चमकला. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळाने ओरियंटल इन्शुरन्सचा ४२-३५ असा पराभव करीत बाद फेरी गाठली.

     महिलांची बाद फेरी नंतर आता साखळी सामन्याना सुरुवात झाली.  इ गटात जे जे हॉस्पिटलने स्नेहविकासला ३९-२० असे नमविले. पूर्वार्धात १८-१०अशी आघाडी घेणाऱ्या जे जे ने उत्तरार्धात देखील जोशपूर्ण खेळ करीत हा विजय मिळविला. वैष्णवी चव्हाण, सविता कावळे यांना या विजयाचे श्रेय जाते. स्नेह विकासच्या रिया तावडे, आस्था कदम बऱ्या खेळल्या. क गटात अश्विनी शेवाळे, सायली कचरे, राजश्री पवार यांच्या चढाई-पकडीच्या भन्नाट खेळामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणने वर्धाच्या युवक ग्रामीण मंडळाचा ३७-१८ असा पाडाव केला. मध्यांतराला २२-१०अशी विजयी संघाकडे आघाडी होती. युवक ग्रामीण कडून रक्षा भलये बरी खेळली. 

    अ गटात नाशिकच्या रचना स्पोर्ट्सने महात्मा फुलेला ४३-०९असे नमवित आगेकूच केली. अपेक्षा मोहिते, वैष्णवी शिंदे, फरजित सय्यद रचनाकडून, तर शुभदा खोत, दीप्ती काकर महात्मा कडून छान खेळल्या. अ गटात ठाणे मनपाने आकाश स्पोर्ट्सवर ४४-०८ असा विजय मिळविला. कोमल देवकर, तेजस्वी पाटेकर, पूजा जाधव यांचा चतुरस्त्र खेळ या विजयात चमकदार ठरला.  आकांक्षा बने, श्रद्धा शेलार यांचा खेळ आज बहरला नाही.  क गटात अमरहिंदने युवा ग्रामीणचा ४७-१० असा पाडाव केला. या सलग दुसऱ्या पराभवाने युवा ग्रामीनचा बाद फेरी गाठण्याच्या मनसुब्यांना सुरुंग लागला आहे. श्रद्धा कदम, तेजश्री सारंग, दिव्या यादव यांच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. फ गटात स्वस्तिक मंडळाने श्रीराम पालघरवर ३३-२१ अशी मात केली. पूर्वार्धात ०७-१०अशा पिछाडीवर पडलेल्या स्वस्तिकने जोरदार कमबॅक करीत हा विजय साकारला.चेतना बटावले, दीक्षा बिरवाडकर यांच्या उत्तम खेळाला या विजयाचे श्रेय जाते. ऐश्वर्या दवणे, दीक्षा परब यांचा पूर्वार्धातील खेळ उत्तरार्धात कोठे दिसला नाही.

Web Title: State level Kabaddi competition: Bank of Baroda, New India Assurance in the knock out round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Kabaddiकबड्डी