राज्यस्तरीय कबड्डी : रत्नागिरी-रायगड आणि मुंबई-ठाणे यांच्यामध्ये रंगणार उपांत्य फेरीचे सामने

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 05:32 PM2020-02-13T17:32:57+5:302020-02-13T17:34:53+5:30

रायगडने कोल्हापूरची 41-12  अशी धूळधाण उडवत  थाटात अंतिम चार संघात धडक मारली

State level Kabaddi: Semi-final match between Ratnagiri-Raigad and Mumbai-Thane | राज्यस्तरीय कबड्डी : रत्नागिरी-रायगड आणि मुंबई-ठाणे यांच्यामध्ये रंगणार उपांत्य फेरीचे सामने

राज्यस्तरीय कबड्डी : रत्नागिरी-रायगड आणि मुंबई-ठाणे यांच्यामध्ये रंगणार उपांत्य फेरीचे सामने

googlenewsNext

मुंबई : स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या  उपउपांत्य फेरीच्या चारही सामन्यांनी कबड्डीप्रेमींची घोर निराशा केली. राज्य अजिंक्यपद स्पर्धेत विजेत्या आणि उपविजेत्या ठरलेल्या रत्नागिरी आणि मुंबई शहरने आपल्या विजयाचा धडाका कायम ठेवत सहजगत्या उपांत्य फेरी गाठली.  

रायगडने कोल्हापूरची 41-12  अशी धूळधाण उडवत  थाटात अंतिम चार संघात धडक मारली तर ठाण्याने मुंबई उपनगरचे आव्हान 42-32 असे सहज परतवून लावले. आता उपांत्य फेरीत रत्नागिरीची झुंज रायगडशी होईल तर मुंबई शहर आणि ठाणे अंतिम फेरीत स्थान मिळविण्यासाठी एकमेकांशी भिडतील.

काल थरारक सामन्यांच्या मेजवानीचा आनंद उपभोगणाऱ्या  प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीत उभारलेल्या जनार्दन राणे क्रीडानगरीत तिसऱ्या दिवशी एकतर्फी सामन्यांचे दाट धुके पसरले होते.  साखळीत दोन्ही लढती जिंकलेल्या रायगडने अमीर धुमाळ आणि स्मितील पाटीलच्या चौफेर चढायांनी कोल्हापूरला पहिल्या मिनिटापासूनच डोके वर काढू दिले नाही. पूर्वार्धातच  कोल्हापूरवर 3 लोण चढवत रायगडने  30-7 अशी निर्णायक आघाडी घेऊन आपला विजय जवळजवळ निश्चित केला. उत्तरार्धातही या लढतीत काहीही चुरस दिसली नाही आणि हा कंटाळवाणा सामना 41-12  असा संपला.
रत्नागिरीलाही सांगलीला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी फार प्रयत्न करावे लागले नाही. चढाईत रोहन गमरे आणि पकडीत शुभम शिंदेचा खेळ इतका भन्नाट होतं की सांगलीचे काहीएक चालले नाही. मध्यंतरालाच 27-11 अशी आघाडी घेत त्यांनी उपांत्य फेरीचा प्रवेश निश्चित केला होता. त्यावर रत्नागिरीने 39-23 असे शिक्कामोर्तब केले. मुंबई शहरनेही आपल्या लौकिकास खेळ करताना काल नशिबाने आलेल्या पालघरला 45-29 असे सहज नमवून उपांत्य फेरी गाठली. सुशांत साईलने सुसाट चढाया करीत 13 गुण टिपले तर ओंकार जाधवने 10 गुणांची कमाई केली. पालघरकडून जतीन तामोरे आणि योगेश देसले यांनी चांगला खेळ केला.

पहिले 3 सामने निरस झाल्यानंतर उपनगर आणि ठाणे यांच्यातील लढत चुरशीची होता होता राहिली. सोनू थळे आणि सूरज दुदले यांनी वेगवान सुरुवात करीत ठाण्याला 19-12 अशी आघाडी मिळवून दिली.  सामना संपायला सहा मिनिटे असताना ठाणे 33-22 असे आघाडीवर होते. तेव्हा उपनगरच्या आकाश कदमने ठाण्यावर खोलवर चढाई करून 2 गुण मिळवले. गुणफलक 25-33 असताना ठाण्याचा फक्त उमेश म्हात्रेच शिल्लक होता. तोसुद्धा चढाईची किमान 30 सेकंद संपताच बाद होणार होता आणि ठाण्यावर लोणची नामुष्की ओढावली होती, पण तेव्हाच निलेश साळुंखे आणि विक्रांत नार्वेकरने उमेशला पकडण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न निव्वळ आत्महत्या ठरला.  ठाण्यावर लोण पडला असता तर गुणफलक 28-33 झाला असता, पण तसे घडले नाही आणि ठाण्याने 42-32 अशी लढत जिंकली.  उमेशने 7 तर सुरजने 8 गुण चढाईचे टिपले.

कोशिश करनेवालो की हार नहीं होती...

मैदानात गाळलेला घाम आणि घेतलेली मेहनत कधीच वाया जात नाही. कित्येकदा माझी संघात निवड होऊनही मी अंतिम संघात खेळू शकलेलो नाही. काहीवेळा संभाव्य संघात निवड झाली पण अंतिम संघात बसू शकलो नाही. म्हणून मी हार मानली नाही. माझा सर्व कबड्डीपटूना हाच सल्ला आहे की धीर सोडू नका, खचू नका. आयुष्यात असे प्रसंग येतातच. त्यांना सामोरे जा. प्रयत्न सोडू नका कारण कोशिश करनेवालो की कभी हार नही होती, असा सल्ला दिला प्रो कबड्डी स्टार धर्मराज चेरलाथन आणि पवन शेरावत यांनी. भारतीय रेल्वे कबड्डी संघाचे प्रशिक्षक राणाप्रताप तिवारी यांनी या दोन्ही कबड्डीच्या स्टार्सना केवळ प्रभादेवीत आणले नाही तर त्यांना उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन करायलासुद्धा लावले. दोघांच्या अनुभवाने साऱ्या खेळाडूंचा उत्साह द्विगुणित झाला होता.

Web Title: State level Kabaddi: Semi-final match between Ratnagiri-Raigad and Mumbai-Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.