ठाणे : श्री मावळी मंडळ ठाणे आयोजीत 68 व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महिला गटातील दुसऱ्या फेरीच्या सामन्यात टागोर नगर मित्र मंडळ मुंबई उपनगर, नवशक्ती क्रीडा मंडळ मुंबई उपनगर, स्वराज स्पोर्ट्स क्लब मुंबई उपनगर, शिवशक्ती क्रीडा मंडळ मुंबई शहर व रा. फ. नाईक विद्यालय नवी मुंबई या संघानी विजय मिळविला. पुरुष गटात दुसऱ्या फेरीच्या सामन्यात जय बजरंग ठाणे, चेंबूर क्रीडा केंद्र मुंबई उपनगर, होतकरू मित्र मंडळ ठाणे, गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर, श्री हनुमान सेवा मंडळ कल्याण व स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर या संघानी विजय मिळविला.
महिला गटातील मुंबई उपनगरच्या टागोर नगर मित्र मंडळाने मुंबई उपनगरच्या निर्विघ्न स्पोर्ट्स अकॅडमि संघाचा ३५-२९असा ६ गुणांनी पराभव केला. सदर सामन्यात मध्यंतराला टागोर नगर मित्र मंडळाकडे १७-९ अशी ८ गुणांची आघाडी घेतली ती सायली फाटक व स्मृती रासम यांच्या उत्कुष्ट चढायांमुळे. मध्यतरानंतर निर्विघ्न स्पोर्ट्स अकॅडमि संघाच्या सपना भालेरावने खोलवर चढाया करीत आपल्या संघाची गुणसंख्या वाढवली. तिला पक्कडीमध्ये भूमी गोस्वामीने सुंदर साथ दिली. परंतु ह्या दोघी आपल्या संघाचा पराभव टाळू शकल्या नाहीत.महिला गटातील दुसऱ्या सामन्यात मुंबई शहरच्या शिवशक्ती क्रीडा मंडळाने पालघरच्या श्री राम कबड्डी संघाचा ३६-२२ असा १४ गुणांनी मात केली. सदर सामन्यात मध्यंतराला शिवशक्ती क्रीडा मंडळाने १७-९ अशी ८ गुणांची आघाडी घेतली ती ज्योती डफळे व प्रतीक्षा तांडेल यांच्या खोलवर चढायांमुळे. त्यांना आरती पाटीलने पक्कडीमध्ये सुंदर साथ दिली. पराभूत संघाकडून ऐश्वर्या काळे-ढवण हिने उत्तम खेळ केला.
पुरुष गटातील अतिशय रोमहर्षक लढतीत मुंबई उपनगरच्या वीर परशुराम कबड्डी संघाने ठाण्याच्या श्री हनुमान वाडी कला केंद्र व सा. संस्था संघाचा अलाहिदा डावात १ गुणांनी विजय मिळवला. सदर सामना सुरुवातीपासूनच अतिशय रोमांचक झाला. सामान्याच्या पूर्वार्धातवीर परशुराम कबड्डी संघाचे सामन्यावर पूर्ण वर्चस्व होते ते आदेश सावंतच्या अष्टपैलू खेळामुळे. मध्यंतराला वीर परशुराम कबड्डी संघाने १६-८ अशी ८ गुणांची आघाडी घेतली. परंतु, मध्यतरानंतर श्री हनुमान वाडी कला केंद्र व सा. संस्था संघाने अतिशय सुंदर खेळ करीत एक एक गुणांनी आपली गुणसंख्या वाढवली ती अनिकेत महाजन व सर्वेश शेडगे यांच्या उत्कुष्ट चढायांमुळे.सामना संपला त्या वेळी दोन्ही संघाचे ३२-३२ अशी समसमान गुणसंख्या होती. नंतर अलाहिदा डावात वीर परशुराम कबड्डी संघाने अतिशय संयमी खेळ करीत सामना १ गुणांनी जिंकला व तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
पुरुष गटातील दुसऱ्या सामन्यात ठाण्याच्या जय बजरंग संघाने मुंबई उपनगरच्या उत्कर्ष क्रीडा मंडळाचा ४१-३४ असा ७ गुणांनी पराभव केला. मध्यंतराला उत्कर्ष क्रीडा मंडळाकडे २३-१२ अशी ११ गुणांची आघाडी होती ती सागर घारेच्या सुंदर पक्कडी आणि अक्षय परबच्या चौफेर चढायांमुळे.परंतु, उत्तरार्धात जय बजरंग संघाच्या अस्लम ईनामदारने बहारदार खेळ करीत आपल्या संघाची गुणसंख्या भराभर वाढवली. त्याला अमोल साळुंखे व मिलिंद दिनकर यांनी पक्कडीमध्ये त्याच तोलाची साथ दिली व सामना संपायला चार मिनिटे शिल्लक असताना ५ गुणांची आश्वासक आघाडी मिळवून सामना ७ गुणांनी जिंकला.
या दिवसाचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून पुरुष गटात श्री हनुमान वाडी कला केंद्र व सा. संस्था संघाचा अनिकेत महाजन व महिला गटात रा. फ. नाईक विद्यालय संघाची दर्शना सणस यांची निवड झाली. अन्य निकाल :
महिला गट:स्वस्तिक क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर (४०) वि. अमर हिंद मंडळ, मुंबई शहर (२४)रा. फ. नाईक विद्यालय, नवी मुंबई (३२) वि. विश्वशांती क्रीडा मंडळ, पालघर (१५)स्वराज स्पोर्ट्स क्लब, मुंबई उपनगर (४०) वि.ज्ञानशक्ती युवा संस्था, ठाणे (१९)नवशक्ती क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर (४१) वि. छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळ, ठाणे (२७)
पुरुष गट:छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळ, ठाणे (४०) वि. रेल्वे पोलीस लाईन बॉयस स्पोर्ट्स क्लब, मुं उपनगर (२७)स्व. आकाश क्रीडा मंडळ, ठाणे (३०) वि. इच्छाशक्ती क्रीडा मंडळ, पालघर (१६)सत्यम सेवा संघ, मुंबई उपनगर (४६) वि. एकता क्रीडा मंडळ, ठाणे (२०)बंड्या मारुती सेवा मंडळ, मुंबई शहर (२७) वि. जय चेरोबा क्रीडा संघ, ठाणे (१७)स्व. विवेक स्मुर्ती, ठाणे (२४) वि. विजय बजरंग, मुंबई शहर (२१)उजाला क्रीडा मंडळ, ठाणे (४२) वि. नवरत्न क्रीडा मंडळ, ठाणे (१७)स्वस्तिक क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर (२५) वि. केदारनाथ क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर (१७)श्री हनुमान सेवा मंडळ, कल्याण (२४) वि. जय भारत क्रीडा मंडळ, मुंबई शहर (१८)गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लब, मुंबई शहर (४०) वि. नंदकुमार क्रीडा मंडळ, ठाणे (१२)होतकरू मित्र मंडळ, ठाणे (३०) वि. कादवड युवक क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर (११)चेंबूर क्रीडा केंद्र, मुंबई उपनगर (४१) वि. टागोर नगर मित्र मंडळ, मुंबई उपनगर (१४)श्री समर्थ क्रीडा मंडळ, ठाणे (४०) वि. अमर हिंद मंडळ, मुंबई शहर (२६)