राज्यस्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धा : अंकुर, सत्यम संघांची विजयी सलामी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 04:25 PM2019-04-12T16:25:02+5:302019-04-12T16:25:16+5:30
उजाळा मंडळ, अंकुर स्पोर्ट्स,शिवशंकर मंडळ, सत्यम स्पोर्टस्, गुड मॉर्निग स्पोर्ट्स यांनी बंड्या मारुती क्रीडा मंडळ आयोजित पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली
मुंबई : उजाळा मंडळ, अंकुर स्पोर्ट्स,शिवशंकर मंडळ, सत्यम स्पोर्टस्, गुड मॉर्निग स्पोर्ट्स यांनी बंड्या मारुती क्रीडा मंडळ आयोजित पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. स्वस्तिक मंडळाने दोन विजय मिळवत बाद फेरीतील आपले स्थान निश्चत केले, तर चेंबूर क्रीडा केंद्राच्या दोन पराभवामुळे त्यांना साखळीतच गाशा गुंडाळावा लागला.
ना.म.जोशी मार्ग येथील ललित क्रीडा केंद्राच्या प्रांगणावर आज पासून सुरू झालेल्या पुरुषांच्या क गटात गुड मॉर्निग स्पोर्ट्सने वीर परशुरामला ४६-१८असे नमवित विजयी सलामी दिली.मध्यांतराला २५-०९अशी आघाडी घेणाऱ्या गुड मॉर्निंगला प्रतिकार असा झालाच नाही. सुदेश कुळे, योगेश्वर खोपडे, स्वप्नील भादवणकर यांचा चतुरस्त्र खेळ या विजयात महत्वाचा ठरला. वीर परशुरामचा चेतन पालवनकर बरा खेळला. फ गटात उपनगरच्या सत्यम सेवा मंडळाने मुंबईच्या बलाढ्य शिवशक्ती मंडळाला ४७-२५ असे पराभूत करताना त्यांच्या सुनील नलावडे, नितीन देशमुख, दीपेश रामाणे यांनी उत्कृष्ट खेळ केला. शिवशक्तीचे मकरंद मसुरकर, संतोष वारकरी बरे खेळले.
ग गटात स्वस्तिकने दोन विजय मिळवीत बाद फेरी गाठली. प्रथम त्यांनी हनुमान सेवा मंडळाचा ३५-१९असा तर नंतर झालेल्या सामन्यात गोलफादेवी मंडळाचा ३५-१६असा सहज पाडाव करीत ही किमया साधली. या दोन्ही विजयात अभिषेक चव्हाण, सिद्धेश पांचाळ, सुयोग राजापकर, निलेश शिंदे यांनी चमकदार खेळ केला. इ गटात अंकुर स्पोर्ट्सने चेंबूर क्रीडा केंद्रावर ४३-४०अशी मात करीत आगेकूच केली. मध्यांतराला २१-२४अशा ३गुणांनी पिछाडीवर पडलेल्या अंकुरच्या सुशांत साईल, किसन बोटे, मिलिंद कोलते यांनी उत्तरार्धात आक्रमक खेळ करीत हा विजय साकारला. चेंबूरच्या आकाश व विराज या कदम बंधूंचा पूर्वार्धात बहरलेला खेळ उत्तरार्धात मात्र कमी पडला. या नंतर झालेल्या सामन्यात चेंबूर केंद्राला ठाण्याच्या मावळी मंडळाकडून ४८-२६ असा पराभव पत्करावा लागला. या दुसऱ्या पराभवामुळे चेंबूर केंद्राला साखळीतच गाशा गुंडाळावा लागला.
ब गटात शिवशंकरने अमर मंडळाला २१-१८ असे, अ गटात उजाळा मंडळाने सुनील स्पोर्ट्सला ३६-३२ असे, तर ड गटात जय भारत मंडळाने नवं जवान मंडळाला ३७-१३असे पराभूत करीत आगेकूच केली.