मुंबई : मुलुंड जिमखाना येथे संपन्न झालेल्या ३ ऱ्या मुलुंड जिमखाना महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या झैद अहमदने माजी राष्ट्रीय विजेत्या योगेश धोंगडेंचा २१-१७ व २५-१७ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करत चषकावर आपले नाव कोरले.
महिलांच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या नीलम घोडकेने मुंबईच्याच ऐशा खोकावलाचा अटीतटीच्या लढतीत २३-१३, ९-२२ व २५-४ असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकाविले. अंतिम फेरीत पोहोचण्यापूर्वी नीलमने उपांत्य लढतीत मुंबईच्या मिताली पिंपळेला २५-१०, १९-१५ असे हरविले. तर ऐशाने ठाण्याच्या मीनल लेले-खरेचा २५-०, २५-९ असा फडशा पडला होता.
पुरुषच्या उपांत्य लढतीमध्ये झैद अहमदने विश्व् विजेत्या मुंबईच्या प्रशांत मोरेला तीन झेट पर्यंत रंगलेल्या सामन्यात २०-१५, २५-१२ व १७-३ असे नमविले. दुसऱ्या लढतीत योगेशने मुंबईच्या संदीप दिवेला २४-१२, २३-७ असे सहज हरविले होते.
विजेत्यांना मुलुंड जिमखान्याचे सचिव श्री प्रकाश पाटील, विश्वस्थ श्री दत्तात्रय तेरेदेसाई, सहसचिव श्री मधुकर ताम्हणकर, सदस्य श्री अनुपम जोशी, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव श्री अरुण केदार व मुंबई उपनगर कॅरम संघटनेचे कार्याध्यक्ष श्री संतोष चव्हाण यांच्या हस्ते तब्बल १ लाख १० हजारांची रोख पारितोषिके व चषक देऊन गौरविण्यात आले.