बलाढ्य कोरियाची उपांत्य फेरीत धडक

By admin | Published: October 17, 2016 04:51 AM2016-10-17T04:51:41+5:302016-10-17T04:51:41+5:30

बलाढ्य कोरियाने नियोजनबद्ध खेळ करून तुलनेत दुबळ्या असलेल्या इंग्लंडला ५६-१७ असे लोळवले.

Strong Korea rallies in semis | बलाढ्य कोरियाची उपांत्य फेरीत धडक

बलाढ्य कोरियाची उपांत्य फेरीत धडक

Next


अहमदाबाद : बलाढ्य कोरियाने नियोजनबद्ध खेळ करून तुलनेत दुबळ्या असलेल्या इंग्लंडला ५६-१७ असे लोळवले. या विजयासह कोरियाने विश्वचषक कबड्डी स्पर्धेच्या ‘अ’ गटात २५ गुणांसह अव्वल स्थान निश्चित करीत उपांत्य फेरीत धडक मारली. सलामीच्या सामन्यात संभाव्य विजेत्या भारताला धक्का दिलेल्या कोरियाने विजयी घोडदौड कायम राखत भारताच्या गटविजेतेपदाचे स्वप्न धुळीस मिळवले.
इंग्लंड संघात असलेल्या भारतीय वंशाच्या खेळाडूंमुळे कोरियाने सावध खेळ करीत अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, इंग्लंडच्या चुकांमुळे कोरियाने सहजपणे गुणांचे
खाते उघडत ७-० अशी आघाडी घेतली. इंग्लंडवर लोण चढणार, असे दिसत असतानाच ९ व्या मिनिटाला तेजस देपलाच्या सुपर टॅकलमुळे इंग्लंडचे खाते उघडले. या वेळी इंग्लंडकडून पुनरागमनाची अपेक्षा होती.
मध्यंतराला २७-४ अशी भलीमोठी आघाडी घेत कोरियाने विजय स्पष्ट केला. चेओल ग्यू शिन याने सर्वाधिक ११ गुणांसह इंग्लंडवर वर्चस्व राखले, तर, डाँग ग्यू किम (८), ग्यूंग ताइ किम (७) आणि याँग जू ओके (६) यांनीही चमकदार खेळ केला.
इंग्लंडकडून तेजसने १० गुणांची कमाई करून एकाकी झुंज दिली. त्याला इतर खेळाडूंकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. कोरियाने इंग्लंडवर ४ लोण चढवून आपला दबदबा राखला. (वृत्तसंस्था)
केनियाने चमकदार विजय मिळवताना जपानचे कडवे आव्हान ४८-२७ असे परतवून सर्वांचे लक्ष वेधले. केनियाने यासह ‘ब’ गटात चौथे स्थान पटकावले आहे. मध्यंतराला १८-१४ असे वर्चस्व राखत केनियाने सामन्यावर पकड
मिळवली.
जेम्स ओबिलो याने भक्कम पकडी करताना ४ सुपर टॅकल करून १३ गुणांसह जपानचे आक्रमण रोखले. ओधिआम्बो ओगाक यानेही बचावात ७ गुण मिळवले. जपानकडून कझुहिरो तकानोने चांगला खेळला.
>थायलंडकडून अमेरिका पराभूत
थायलंडने ‘ब’ गटात द्वितीय स्थान पटकावताना अमेरिकेचा ६९-२२ असा धुव्वा उडवला. मध्यंतरालाच थायलंडने ४०-३ अशी तब्बल ३७ गुणांची आघाडी घेत अमेरिकेच्या आव्हानातली हवा काढली. विश्रांतीनंतर अमेरिकेने थोडाफार प्रतिकार केला, परंतु थायलंडच्या आक्रमकतेपुढे त्यांचा निभाव लागला नाही. कर्णधार खोमसान थोंगखाम (१४) आणि चॅनविट विचियान (१२) यांनी थायलंडच्या विजयात मोलाचे योगदान दिले. अमेरिकेकडून बिस्मार्क चार्ल्स (९) एकाकी लढला.

Web Title: Strong Korea rallies in semis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.