फ्रेंच ओपनमध्ये आज रंगणार ‘सुपरवॉर’; नदाल, फेडरर उपांत्य सामन्यात भिडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 02:36 AM2019-06-07T02:36:06+5:302019-06-07T06:34:33+5:30
‘क्ले कोर्टचा बादशाह’ नदाल आणि टेनिसविश्वाचा सम्राट अशी ओळख असलेला फेडरर अंतिम फेरी गाठण्यासाठी लढणार असल्याने या वेळी टेनिसप्रेमींना उच्च दर्जाच्या खेळाचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे
पॅरिस : ज्या सामन्याची जगभरातील कोट्यवधी टेनिसप्रेमी आतुरतेने प्रतीक्षा करीत असतात त्या सामन्याचा आनंद लुटण्याची संधी सर्वांना शुक्रवारी मिळणार आहे. स्पेनचा राफेल नदाल आणि स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर हे टेनिसविश्वातील दोन कट्टर प्रतिस्पर्धी फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत एकमेकांविरुद्ध भिडतील.
‘क्ले कोर्टचा बादशाह’ नदाल आणि टेनिसविश्वाचा सम्राट अशी ओळख असलेला फेडरर अंतिम फेरी गाठण्यासाठी लढणार असल्याने या वेळी टेनिसप्रेमींना उच्च दर्जाच्या खेळाचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे.
विशेष म्हणजे २०१७ साली झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन अंतिम सामन्यानंतर या दोन्ही खेळाडूंमध्ये पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम लढत होणार आहे. हे दोन्ही खेळाडू आतापर्यंत एकूण ३८व्यांदा एकमेकांविरुद्ध खेळले असून त्यात नदाल २३-१५ असा वरचढ ठरला आहे.
मात्र या दोन्ही खेळाडूंमध्ये झालेल्या गेल्या पाच लढतींमध्ये फेडररने बाजी मारली आहे. शिवाय फ्रेंच ओपनमध्ये आतापर्यंत एकदाही फेडररला नदालविरुद्ध जिंकता आलेले नाही. त्यामुळेच शुक्रवारचे ‘घमासान युद्ध’ कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.