नवी दिल्ली : डोपिंग हा खेळांना ग्रासलेला कर्करोग असल्याचे सांगून दिग्गज धावपटू मिल्खासिंग यांनी डोपिंगमध्ये अडकणारे खेळाडू, त्यांचे कोच आणि डॉक्टरांवरही निलंबनाचा बडगा उगारणे आवश्यक असल्याचे मत नोंदविले आहे.‘फ्लाइंग शीख’ नावाने परिचित असलेले मिल्खा यांनी मुलांसाठी एका फिटनेस कार्यक्रमाची सुरुवात केली. या वेळी ते म्हणाले, ‘‘डोपिंग खेळातील कर्करोग आहे. सरकार आणि क्रीडा संघटनांनी याविरुद्ध कडक धोरण राबवावे. खेळाडूंप्रमाणे कोच आणि डॉक्टरांना निलंबित करण्यात यावे, कारण हा सर्व प्रकार त्यांच्याच देखरेखीत होतो.’’ भारताचे अनेक खेळाडू विशेषत: भारोत्तोलक डोपिंगमध्ये अडकले आहेत. केरळमध्ये अलीकडेच झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या वेळी काही खेळाडू डोपिंगमध्ये दोषी आढळले होते. यावर मिल्खा म्हणाले, ‘‘देशाला स्वातंत्र्य मिळून ६० वर्षे झाली, तरी दुसरा मिल्खा घडू शकला नाही याला दोषी भारतीय अॅथलेटिक्स संघटना आहे. देशात सव्वाशे कोटी लोकांमध्ये दुसरा मिल्खा शोधता न येणे हे आमचे दुर्दैव आहे. याचा अर्थ आमचे खेळाडू, कोच आणि संघटना काम करण्यात कमी पडतात.’’१९६४च्या रोम आॅलिम्पिकमध्ये सेकंदाच्या थोड्या फरकाने पदकापासून वंचित राहिलेले ८६ वर्षांचे मिल्खासिंग यांनी आॅलिम्पिकमध्ये सुवर्णविजेता भारतीय धावपटू पाहणे ही ‘याचि देही याचि डोळा’ इच्छा असल्याचे मनोगत व्यक्त केले. (वृत्तसंस्था)
डोपिंगमधील दोषी खेळाडूंच्या कोचचे निलंबन व्हावे
By admin | Published: April 02, 2015 1:37 AM