टीम इंडिया प्रबळ दावेदार

By admin | Published: March 7, 2016 11:35 PM2016-03-07T23:35:00+5:302016-03-07T23:35:00+5:30

आशियात ‘शेर’असल्याचे सिद्ध केल्यानंतर आता मंगळवारपासून क्वालिफायर्सने प्रारंभ होणाऱ्या टी-२० विश्वकप स्पर्धेत टीम इंडियाकडून विजयाची पताका डौलाने फडकत राहू द्या, अशीच अपेक्षा चाहत्यांना आहे.

Team India Prabal Contenders | टीम इंडिया प्रबळ दावेदार

टीम इंडिया प्रबळ दावेदार

Next

नागपूर : आशियात ‘शेर’असल्याचे सिद्ध केल्यानंतर आता मंगळवारपासून क्वालिफायर्सने प्रारंभ होणाऱ्या टी-२० विश्वकप स्पर्धेत टीम इंडियाकडून विजयाची पताका डौलाने फडकत राहू द्या, अशीच अपेक्षा चाहत्यांना आहे. आशिया कप जिंकून विश्वकप स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे सिद्ध करणारा भारतीय संघ टी-२० विश्वकप स्पर्धेत जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.
स्पर्धेला सुरुवात १५ मार्चपासून होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड संघांदरम्यान सलामी लढत रंगणार आहे. त्याआधी, क्वालिफायर लढती होणार आहेत. त्या आधारावर सुपर १० मधील उर्वरित दोन संघ निश्चित होतील. पहिल्या दिवशी क्वालिफायरचे दोन सामने होणार आहेत. त्यात झिम्बाब्वे विरुद्ध हाँगकाँग आणि स्कॉटलंड विरुद्ध अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे. पात्रता फेरीत सहभागी होणाऱ्या अन्य दोन संघांमध्ये आयर्लंड व नेदरलँड या संघांचा समावेश आहे. पात्रता फेरीतील दोन अव्वल संघ भारत, आॅस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या संघांसोबत सुपर १० फेरीत सहभागी होतील. सुपर १० संघांदरम्यानच्या लढती १५ ते २८ मार्च या कालावधीत होणार आहेत. तेव्हाच विश्वकप महिला टी-२० स्पर्धेतच लढती खेळतील.
पुरुष विभागात श्रीलंका संघ गतचॅम्पियन आहे, पण अलीकडच्या कालावधीतील त्यांची कामगिरी निराशाजनक आहे. दुसऱ्या बाजूचा विचार करता २००७ च्या चॅम्पियन भारतीय संघाला मायदेशातील चाहत्यांचे भरघोस समर्थन मिळणार आहे. आशिया कप टी-२० स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने एकही लढत गमावली नाही. त्यापूर्वी आॅस्ट्रेलिया व श्रीलंका या संघांविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाने वर्चस्व गाजवले. सुपर टेनमध्ये भारताच्या गटात पाकिस्तान, आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि एक क्वालिफायर संघ राहील.
भारतीय संघाला १५ मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध सलामी लढत खेळायची असून त्यानंतर १९ मार्च रोजी पाकिस्तानविरुद्ध लढत होणार आहे. बंगळुरूमध्ये क्वालिफायरविरुद्ध भारताची लढत २३ मार्चला, तर आॅस्ट्रेलियाविरुद्ध २७ मार्च रोजी मोहालीत सामना होईल.
श्रीलंका सुपर टेनच्या ग्रुप वनमध्ये असून त्यात दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि क्वालिफायरचा समावेश असेल. श्रीलंका संघाला सलामी लढत १७ मार्च रोजी कोलकाता येथे क्वालिफायरसोबत खेळायची आहे, तर २० मार्च रोजी बंगळुरूमध्ये विंडीजविरुद्ध लढत होईल. २६ मार्च रोजी इंग्लंडविरुद्ध आणि २८ मार्च रोजी दक्षिण आफ्रिका या संघांविरुद्ध लढती होतील.
२००९ चा चॅम्पियन पाकिस्तान संघ १६ मार्च रोजी कोलकातामध्ये क्वालिफायरसोबत खेळेल. भारताच्या लढतीनंतर पाकिस्तान संघाला २२ व २५ मार्च रोजी अनुक्रमे न्यूझीलंड व आॅस्ट्रेलिया या संघांविरुद्ध खेळावे लागेल.
२०१० चा चॅम्पियन इंग्लंड संघ १६ मार्च रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळेल. त्यानंतर दक्षिण आफ्रिका (१८ मार्च), क्वालिफायर (२३ मार्च) आणि श्रीलंका (२६ मार्च) यांच्यासोबत लढती होतील. वेस्ट इंडिज संघ इंग्लंडविरुद्ध खेळल्यानंतर श्रीलंका (२० मार्च), दक्षिण आफ्रिका (२५ मार्च) आणि क्वालिफायर (२७ मार्च) या संघांविरुद्ध खेळणार आहे.
पुरुष विभागात आठ संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. त्यात पात्रता फेरीतील अव्वल दोन संघ सहभागी होतील. महिला विभागात १० संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली असून प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. पुरुष गटातील क्वालिफायर सामने धर्मशाला व नागपूरमध्ये खेळले जाणार आहेत. ‘अ’ गटात बांगलादेश, नेदरलँड, आयर्लंड आणि ओमान संघांचा, तर ‘ब’ गटात झिम्बाब्वे, स्कॉटलंड, हाँगकाँग व अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे.
पुरुष विभागात एकूण ५६ लाख डॉलर्सचा पुरस्कार आहे. २०१४ च्या तुलनेत या रकमेत ८६ टक्के वाढ झाली आहे. महिला विभागात एकूण चार लाख डॉलर्सची पुरस्कार राशी राहील. गेल्या वेळच्या तुलनेत यात १२२ टक्के वाढ झाली आहे. स्पर्धेत एकूण ५८ सामने होतील. त्यात पुरुष विभागात ३५, तर महिला विभागात २३ सामन्यांचा समावेश आहे. उपांत्य फेरीचे सामने नवी दिल्ली व मुंबई येथे ३० व ३१ मार्च रोजी खेळले जाणार आहेत, तर अंतिम लढत कोलकाता येथे ३ एप्रिल रोजी रंगणार आहे.
> आयसीसी पुरुष ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला विजयाचा प्रबळ दावेदार मानण्यात येत आहे. धोनीने २००७ चा पहिला ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकला होता.
विजेतेपदाचा बचाव करण्यासाठी उतरणारा श्रीलंकेचा संघ त्यामानाने तगडा भासत
नाही, त्यांचे प्रमुख खेळाडू निवृत्त झाले आहेत, तर हुकमी एक्का गोलंदाज लसिथ मलिंगा दुखापतीने ग्रासला आहे.
वनडेचा विश्वचषक पाच वेळा जिंकणाऱ्या आॅस्ट्रेलिया संघाला या प्रकारात अजून एकदाही विश्वविजेतेपद मिळालेले नाही. यंदा स्मिथच्या नेतृत्वाखालील संघ ही कसर भरून काढण्यासाठी प्रयत्न करेल.
> पुरुष विभाग (पहिली फेरी)
ग्रुप ‘अ’ : - बांगलादेश, नेदरलँड, आयर्लंड आणि ओमान.
ग्रुप ‘ब’ : - झिम्बाब्वे, स्कॉटलंड, हाँगकाँग व अफगाणिस्तान.
> दुसरी फेरी
सुपर टेन ग्रुप वन : - श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि ग्रुप ‘ब’मधील विजेता संघ.
सुपर टेन ग्रुप दोन : - भारत, पाकिस्तान, आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि ग्रुप ‘अ’मधील विजेता संघ
> महिला विभाग
ग्रुप ‘अ’ : - आॅस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका,
न्यूझीलंड, श्रीलंका आणि आयर्लंड.
ग्रप ‘ब’ :- इंग्लंड, वेस्ट इंडिज, भारत,
पाकिस्तान आणि बांगलादेश.

Web Title: Team India Prabal Contenders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.