आसाम सरकारकडून अंकुशिताला दहा लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 01:48 AM2017-11-29T01:48:49+5:302017-11-29T01:49:00+5:30
एआयबीए विश्व यूथ बॉक्सिंग स्पर्धेची सुवर्णविजेती आणि सर्वोत्कृष्ट बॉक्सरचा बहुमान पटकविणारी स्थानिक ‘स्टार’ अंकुशिता बोरो हिला आसाम सरकारने दहा लाख रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर केले आहे.
नागपूर : एआयबीए विश्व यूथ बॉक्सिंग स्पर्धेची सुवर्णविजेती आणि सर्वोत्कृष्ट बॉक्सरचा बहुमान पटकविणारी स्थानिक ‘स्टार’ अंकुशिता बोरो हिला आसाम सरकारने दहा लाख रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर केले आहे. अंकुशिताने लाईट वेल्टरवेट (६४ किलो) प्रकारात रशियाची एकेतेरिना दायनिक हिचे आव्हान ४-१ असे मोडीत काढून रविवारी सुवर्ण जिंकले होते.
गुवाहाटीपासून २०० किमी अंतरावर असलेल्या लहानशा गावातील १७ वर्षांच्या अंकुशिताने अनेक अडचणींवर मात करीत ‘विश्व चॅम्पियन’ होण्याचा मान मिळविला. आयबाची ती सर्वोत्कृष्ट बॉक्सर ठरली. सुवर्ण जिंकताच बीएफआय अध्यक्ष अजयसिंग यांनी तिला दोन लाख रुपये दिले. राज्याचे क्रीडामंत्री नबाकुमार डोलाय यांनी आज दहा लाखाचा पुरस्कार जाहीर करताच अंकुशिताच्या गावात उत्साह संचारला. तिच्या भव्य सत्कारासाठी नागरिकांसह, सामाजिक, संघटना आणि राजकीय पुढाºयांकडून आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला आहे.