'मंझिलें और भी है!'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 03:41 AM2020-01-01T03:41:52+5:302020-01-01T03:41:59+5:30

क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांना आगामी वर्षात भारताचे क्रीडा क्षेत्रात यश वाढण्याची खात्री

'There's more floors!' | 'मंझिलें और भी है!'

'मंझिलें और भी है!'

Next

अनेक भारतीयांनी गेल्या वर्षात अभिमानास्पद कामगिरी केली. यात पी. व्ही. सिंधू, बी. साई प्रणीत, मानसी जोशी, विनेश फोगट, दीपक पुनिया, बजरंग पुनिया, राहुल आवारे, विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदकांची लयलूट करणारे भारतीय नेमबाज, ‘गोल्डन गर्ल’ धावपटू हिमा दास, जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण जिंकणारी दूती चंद यांच्यासह अनेकांचा उल्लेख करता येईल.

भारतीयांमधील गुणवत्ता... ते घेत असलेले परिश्रम आणि यासह त्यांना मिळणारी सरकारची सर्वतोपरी साथ या त्रिसूत्रीच्या जोरावर यशाची ही पताका २०२० मध्ये आणि त्यापुढील काळात आणखी उंचावत जाणार, याची खात्री आहे,’ अशा शब्दांत भारतीय क्रीडाक्षेत्राचे २०१९ मधील यश सांगतानाच राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी २०२० मध्ये भारतीय खेळाडू यशाचे नवे आयाम गाठतील, याची खात्री दिली. बकोरिया यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना २०२० मध्ये क्रीडा विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत माहिती दिली.

अलीकडे आपल्या देशात आरोग्याबाबत जागरूकता मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचे निरीक्षण नोंदवताना बकोरिया म्हणाले, ‘अगदी ग्रामीण भागातही पहाटे फिरायला जाणे व व्यायाम करणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसते. आरोग्य आणि खेळ यांचे नाते अतिशय जवळचे आहे. खेळाडूंसोबतच सर्व वयोगटांतील स्त्री-पुरुष वेळ मिळेल तेव्हा घाम गाळताना दिसतात. ‘फिट इंडिया’ मोहिमेचा मोठा फायदा झाला. समाज आरोग्याबाबत जागरूक होणे, हे क्रीडा संस्कृती विकसित होण्यास पोषक असते. हे पाहता भारतीय खेळाडू जागतिक स्तरावर आणखी भरीव कामगिरी करणार, अशी मला खात्री आहे.’

केंद्र व राज्य सरकार खेळाडूंसाठी अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून देत आहे. याचा सकारात्मक परिणाम खेळाडूंच्या कामगिरीवर होत असल्याचे सांगताना बकोरिया म्हणाले की, ‘कामगिरी उंचावण्यास खेळाडूंना सातत्याने स्पर्धात्मक वातावरण मिळणे गरजेचे आहे. ते मिळावे म्हणून विशिष्ट खेळात ज्या राज्याचे वर्चस्व असेल, तेथील खेळाडूंसोबत देशातील इतर गुणवान खेळाडूंना स्पर्धात्मक सरावाची जास्तीत जास्त संधी मिळायला हवी. महाराष्ट्राचा क्रीडा विभागही त्यादृष्टीने प्रयत्न करणार आहे. आंतरअकादमी स्तरावरही असा उपक्रम राबविण्याचा प्रस्ताव आम्ही दिला आहे. प्रशिक्षकांनी स्वत:ला अपडेट ठेवायला हवे. ही गोष्ट खूपच महत्त्वपूर्ण आहे.’

बेबी लीग
पुढील ३ आॅलिम्पिकसाठी खेळाडू घडविण्याच्या योजनांचा एक भाग म्हणून या वर्षीपासून ८, १० आणि १२ वर्षांखालील खेळाडूंसाठी राज्य स्तरावर ‘बेबी लीग’चे आयोजन करण्यात येत आहे. यात फुटबॉल, अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटन आणि जिम्नॅस्टिक यांचा समावेश असेल. प्रथम जिल्हा पातळीवर ही लीग होईल. यात चमकणारे खेळाडू राज्य स्तरावर खेळतील. त्यात यश मिळविणाºया खेळाडूंना भविष्याच्या दृष्टीने तयार करण्याची योजना असल्याचे बकोरिया म्हणाले.

गो गर्ल्स गो
‘टीन एज’ मुलींमध्ये तंदुरुस्तीबाबत जागरूकता वाढावी, हा उद्देश ठेवून ‘गो गर्ल्स गो’ उपक्रम २०२० पासून राज्य सरकारचा क्रीडा विभाग राबविणार आहे. ८ ते १४ वर्षांखालील मुलींना केंद्रस्थानी ठेवून पारंपरिक खेळांबरोबरच प्रचलित खेळांचा यामध्ये समावेश असेल, लवकरच यासंदर्भातील जीआर काढण्यात येईल.

दिव्यांग खेळाडूंना सरावाची व्यवस्था
दिव्यांग खेळाडूंनी २०१९ मध्ये आणि त्यापूर्वीही जागतिक स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे. त्यांच्या सरावाच्या सोयीसाठी क्रीडा विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यानुसार, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविणाºया खेळाडूंना शासनाच्या क्रीडा संकुलात मोफत सरावाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

जिल्हा पातळीवर नियोजन : पुढील ३०-४० वर्षांत आपल्या भागातील आवश्यक क्रीडा सुविधांची माहिती घेऊन राज्य शासन जिल्हा पातळीवर त्यादृष्टीने योग्य नियोजन करणार आहे. क्रीडा आयुक्तांच्या माहितीनुसार, याअंतर्गत जिल्ह्याच्या मागणीनुसार ‘हाय परफॉर्मन्स गेम्स’मधील क्रीडा प्रकाराच्या मैदानापासून प्रशिक्षणापर्यंतची सोय करण्यात येईल.

२०२० च्या आॅलिम्पिकसाठी नेमबाज तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, तिरंदाज प्रवीण जाधव आणि अ‍ॅथलिट अविनाश साबळे हे राज्यातील ४ खेळाडू पात्र ठरले आहेत. यापुढील काळात ही संख्या वाढलेली असेल, याची ग्वाही मी देतो. २०२४, २०२८ आणि २०३२ या ३ आॅलिम्पिक स्पर्धांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व वाढावे आणि आपल्या खेळाडूंनी देशाला पदके जिंकून द्यावी, यावर आपला भर असेल. यादृष्टीने बालवयातच खेळाडूंमधील गुणवत्ता हेरून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. - ओमप्रकाश बकोरिया

Web Title: 'There's more floors!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.