जपानमध्ये आॅलिम्पिक मशाल पाहण्यासाठी हजारोंनी केली गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 02:04 AM2020-03-23T02:04:54+5:302020-03-23T04:40:02+5:30
उत्तर पूर्व जपानमध्ये आॅलिम्पिक मशाल पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने क्रीडाप्रेमींनी गर्दी केली होती
सेंडाई : जगभरामध्ये कोरोना विषाणू महामारीचे सावट असताना अनेक देशांतील नागरिक मोठ्या संख्येने एकत्रित जमण्याचे टाळत आहेत. असे असतानाही जपानमध्ये मात्र शनिवारी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय आगामी टोकियो आॅलिम्पिकची मशाल पाहण्यासाठी एकत्रित जमला होता. यामुळे जगभरातून जपान सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
उत्तर पूर्व जपानमध्ये आॅलिम्पिक मशाल पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने क्रीडाप्रेमींनी गर्दी केली होती. यावेळी अनेकांनी मशालसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतानाच मोठी गर्दी केली होती. आॅलिम्पिक मशाल शुक्रवारीच जपानमध्ये दाखल झाली आणि अत्यंत साध्या कार्यक्रमात मशालीचे स्वागत करण्यात आले. यावेळी केवळ टोकियो आॅलिम्पिक समितीच्या सदस्यांची उपस्थिती होती. प्रेक्षकांना प्रवेश टाळण्यात आल्याने जपान सरकारच्या निर्णयाचे कौतुकही झाले होते. मात्र शनिवारी अगदी याऊलट चित्र दिसल्याने आता यजमानांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे.
टोकियो आॅलिम्पिक २०२० वर कोरोना विषाणूच्या संक्रमणाचे सावट अधिक आहे आणि त्यामुळेच जगभरातून आॅलिम्पिक स्थगित करण्याची मागणी होत आहे. परंतु,टोकियो आॅलिम्पिक समिती आणि आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समिती (आयओसी) निर्धारीत वेळेत आॅलिम्पिक स्पर्धा पार पाडण्यावर ठाम आहेत.
सेंडाईतील मियागी स्टेडियममध्ये आॅलिम्पिक मशालला प्रदर्शित करण्यात आले होते आणि शनिवारी ५० हजारांपेक्षा अधिक नागरिक ही मशाल बघण्यासाठी पोहोचले. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या मते, लोक ५०० मीटर लांब रांगेत तासन्तास उभे होते. त्यात जास्तीत जास्त लोकांनी मास्क घातले होते आणि त्यांनी मशालीसोबत आपले छायचित्रही काढले. एका ७० वर्षीय महिलेने स्थानिक प्रसारक संस्थेला, ‘मी आॅलिम्पिक मशाल बघण्यासाठी तीन तास रांगेत उभी होते,’ असे सांगितले. (वृत्तसंस्था)
आॅलिम्पिक स्थगित करण्यासाठी आयओसीवर दबाव वाढला
- अमेरिकेच्या प्रभावी ट्रॅक अॅण्ड फिल्ड महासंघाने आॅलिम्पिक स्पर्धा स्थगित करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीवर (आयओसी) टोकियो आॅलिम्पिक २०२० स्पर्धा स्थगित करण्याचा दबाव वाढला आहे. स्पर्धा स्थगित करण्याची मागणी करणाऱ्या क्रीडा महासंघांमध्ये अमेरिकेच्या ट्रॅक अॅण्ड फिल्ड महासंघाचा (यूएसएटीएफ) समावेश झाला आहे.
महासंघाचे अध्यक्ष मॅक्स सीगल यांनी आपल्या पत्रात सन्मानपूर्वक विनंती केली आहे की, ‘अमेरिका आॅलिम्पिक व पॅरालिम्पिक समितीने (यूएसओपीसी) टोकियो २०२० आॅलिम्पिक स्पर्धा स्थगित करण्यासाठी समर्थन करायला हवे.’ यूएसओपीसीने म्हटले की, ‘२४ जुलै ते ९ आॅगस्ट या कालावधीत होणारी ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घाईचा ठरेल. आयओसीचे प्रमुख थॉमस बाक यांनी यापूर्वी असे वक्तव्य केले आहे.’
सीगल यांनी आपल्या पत्रात लिहिले की, ‘प्रत्येकाने स्वास्थ्य व सुरक्षा याला प्राधान्य द्यायला हवे आणि जबाबदारीने पाऊल टाकायला हवे. परिस्थिती ओळखून आमचे खेळाडू व आॅलिम्पिकच्या त्यांच्या तयारीवर होत असलेल्या प्रभावाची जाणीव ठेवायला हवी.’
यूएसएटीएफच्या एक दिवसापूर्वी अमेरिका जलतरण महासंघाने यूएसओपीसीला आॅलिम्पिक स्पर्धा २०२१ पर्यंत पुढे ढकलण्याचे समर्थन करण्यास सांगितले होते. फ्रान्सच्या जलतरण महासंघानेही त्यांच्या सुरात सूर मिसळताना सध्याच्या परिस्थितीमध्ये स्पर्धेचे योग्य प्रकारे आयोजन केल्या जाऊ शकत नसल्याचे म्हटले होते. स्पेनच्या अॅथलेटिक्स महासंघाने स्पर्धा स्थगित करण्याची मागणी केली होती. स्पेन अॅथलेटिक्स महासंघाने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले की,‘रॉयल स्पॅनिश अॅथलेटिक्स महासंघाच्या (आरएफइए) संचालकांनी स्पेनच्या जास्तीत जास्त खेळाडूंतर्फे टोकियो २०२० आॅलिम्पिक स्पर्धा स्थगित करण्याची मागणी केली.’
नॉर्वे आॅलिम्पिक समितीने (एनओसी) म्हटले की, ‘शुक्रवारी आयओसीला एक पत्र पाठविले असून त्यात स्पष्ट शिफारस केली आहे की, ‘जेव्हापर्यंत जागतिक पातळीवर कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत टोकियो आॅलिम्पिकचे आयोजन व्हायला नको.’
ब्रिटनच्या अॅथलेटिक्स महासंघाच्या नव्या अध्यक्षांनीही कोरोनाबाबत अनिश्चिततेच्या सावटामध्ये आॅलिम्पिकच्या आयोजनावर प्रश्न उपस्थित केला.